
नो नोट नाकारली
डॉक्टरांनी नाकारली दोन हजाराची नोट
कोल्हापूर, ता. २९ ः चलनातून दोन हजाराच्या नोटा परत घेण्याचे आदेश दिले असले तरी अजूनही या नोटा चालतात, असे असताना दसरा चौक परिसरातील एका डॉक्टरांनीच दोन हजाराची नोट नाकारली. परिणामी संबंधित रूग्णाला औषध न घेताच घरी जाण्याची वेळ आली. दोन हजाराच्या नोटावर बंदी नसल्याचे सांगूनही संबंधित डॉक्टरांनी आरेरावी करत कुठे तक्रार करायची तिथे करा, अशी उद्धट भाषा वापरून संबंधिताला रूग्णालयातून घालवले.
कान, नाक व घशासी संबंधित दसरा चौकातील डॉक्टरांकडे एक रूग्ण गेले होते. त्यांची तपासणी करून काही औषधे संबंधित डॉक्टरांनी दिली. ही औषधे याच परिसरातील काही दुकानात घेण्याचा प्रयत्न केला, पण दुकानदारांनी ही औषधे फक्त त्याच डॉक्टरांच्या दुकानात मिळतात, असे सांगितल्याने संबंधित रूग्ण त्या डॉक्टरांच्या रूग्णालयात गेले. चिठ्ठीत लिहल्याप्रमाणे दुकानातील कामगाराने औषध दिले, त्याचे बिल सुमारे एक हजार झाले. या बिलापोटी रूग्णाने दोन हजारांची नोट दिल्यानंतर दुकानाताली कामगाराने ती घेण्यास नकार देऊन डॉक्टरांना भेटण्यास सांगितले. डॉक्टरांनीच भेट घेतल्यानंतर त्यांनीही ही नोट घेणार नाही असे सांगून बांधून ठेवलेली औषधेही परत घेतली. अनेकवेळा समजावून सांगूनही संबंधित डॉक्टराने दमदाटी करतच ही नोट घेणार नसल्याचे सांगत कोणाकडे तक्रार करायची तिकडे करा, असा दम भरला. त्यामुळे या रूग्णाला औषध न घेताच परतावे लागले. संबंधित डॉक्टरांकडे सकाळी अकरा वाजता गेलेल्या या रूग्णाचा नंबर सायंकाळी पाचच्या सुमाराला आला. त्यानंतर नोटेवरून वाद झाल्याने विनाकारण त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली.