
विद्यापीठ परीक्षेत ‘कॉपी’ करताना १५ विद्यार्थी सापडले
पदवी परीक्षेत सापडले १५ कॉपीबहाद्दर
शिवाजी विद्यापीठाच्या भरारी पथकाची कारवाई
कोल्हापूर, ता. २९ ः शिवाजी विद्यापीठाच्या मार्च- एप्रिल उन्हाळी सत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. त्यामध्ये सोमवारी विद्यापीठाच्या भरारी पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कारवाई केली. त्यामध्ये १५ विद्यार्थी कॉपी (गैरप्रकार) करताना सापडले. त्यांच्यावर परीक्षा प्रमाद समितीमार्फत नियमानुसार कारवाई होणार आहे.
बी. कॉम., बी. ए., कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, डिझाईन, आर्टस अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन, आर्टस् (ड्रेस मेकिंग अँड फॅशन को-ऑर्डिनेशन), कॉमर्स बँक मॅनेजमेंट, सोशल वर्क, बी. कॉम (आयटी), बी. ए. डिफेन्स स्टडी, इंटेरियर डिझाईन या अभ्यासक्रमांच्या सोमवारी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध केंद्रांवर परीक्षा झाली. त्यासाठी एकूण ३१३४४ विद्यार्थी उपस्थित होते. या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक (ऑफलाईन) पद्धतीने घेण्यात आल्या. या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणांची नोंद भरारी पथकांनी परीक्षा प्रमाद समितीकडे केली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
................
चार दिवसांत ४९ जणांवर कारवाई
दरम्यान, या परीक्षा २५ मे पासून सुरू झाल्या आहेत. त्यात विद्यापीठ कार्यक्षेत्रात कॉपी करताना पहिल्या दिवशी १५ विद्यार्थी, दुसऱ्या दिवशी ५ आणि शनिवारी १४, तर सोमवारी १५ जणांना भरारी पथकाने पकडण्याची कारवाई केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.