
राष्ट्रवादी बैठक
लोकसभेसाठी कोल्हापुरातून मुश्रीफच योग्य
मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमत ः यापुर्वीचा अनुभव पाहता उसना उमेदवार नको
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून दोन्ही काँग्रेससह शिवसेनेची आघाडी झाली आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास आमदार हसन मुश्रीफ हेच राष्ट्रवादीकडून योग्य उमेदवार असल्याचे एकमत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
दरम्यान, बैठकीला उपस्थित विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अवस्थेवरून नेत्यांचीही चांगलीच झाडाझडती घेतल्याचे समजते. महापालिका, जिल्हा परिषदेतील पक्षाच्या ढासळलेल्या प्रगतीबाबत त्यांनी खडे बोल सुनावल्याचे समजते. यापुर्वीचा अनुभव पाहता उसना उमेदवार कोणत्याही परिस्थितीत देऊ नये, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.
पुढच्यावर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाच्या पातळीवर सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत आज झाली. बैठकीला श्री. मुश्रीफ यांच्यासह जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैय्या माने, ‘गोकुळ’ चे संचालक युवराज पाटील, नाविद मुश्रीफ, मानसिंगराव गायकवाड आदी उपस्थित होते.
यापूर्वी छत्रपती संभाजीराजे व खासदार धनंजय महाडिक यांना पक्षाने उमेदवारी दिली, पण त्यांच्याकडून पक्ष वाढीसाठी काही फायदा तर झालाच नाही पण ते दोघेही नंतर पक्षापासून दूर केले. हा अनुभव पाहता उसना उमेदवार कोणत्याही परिस्थितीत स्विकारला जाणार नाही, तसा प्रयत्नही न करण्याची मागणी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी या बैठकीत केली. याशिवाय या बैठकीत उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्यासह अन्य काही पर्यायी नावांवरही चर्चा झाली. श्री. मुश्रीफ यांना अडचण असल्यास के. पी. पाटील यांनाच रिंगणात उतरावे लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे भाषण सुरू असताना ए. वाय.- के. पी. यांच्यातील वाद मिटवून ए. वाय. यांनाच लोकसभेसाठी उतरावे, अशी टिप्पणीही श्री. पवार यांनी केली.
या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, विधान परिषद आमदार अरूण लाड आदी उपस्थित होते.
.........
... तर जयंत पाटील
कोल्हापूर व हातकणंगले असे दोन मतदारसंघ जिल्ह्यात येतात. हातकणंगले मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास या मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना रिंगणात उतरण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या नावावरही चर्चा झाली.
.............
तुमच्या सोयीचे बघू नका
बैठकीत कोल्हापुरातून आपल्याकडे एक उमेदवार आहे, पण सध्या ते शिवसेनेते आहेत, त्यांना पक्षात घेऊन उमेदवार देता येईल, असा सूर श्री. मुश्रीफ यांनी आळवला. त्यांच्या बोलण्याचा रोख माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तुमच्या सोयीचे राजकारण बघू नका, पक्षाची गरज बघा, असे सुनावल्याचे समजते.
...........
..आणि हास्याचे फवारे उडाले
बैठकीत आमदार राजेश पाटील यांनी लोकसभेसाठी ‘गोकुळ’ चे अध्यक्ष अरूण डोंगळे हेही योग्य असल्याचे सांगितले. त्यावर ते आपल्या पक्षात तरी आहेत का? असा टोला अजित पवार यांनी लगावताच बैठकीत हास्याचे फवारे उडाले. अलिकडेच श्री. पवार यांनी श्री. डोंगळे यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.