
... अन्यथा ६ जूनला आंदोलन करणार!
... अन्यथा ६ जूनला आंदोलन करणार!
संकेश्वर- बांदा महामार्ग बाधीत शेतकरी संघटनेचा इशारा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३० ः संकेश्वर- बांदा महामार्ग रस्त्याच्या रूंदीकरण व मजबुतीकरणास लागणाऱ्या जमिनीचे रितसर भुसंपादन करून मोबदला मिळावा. अन्यथा ६ जूनला आंदोलन करणार आहे, असा इशारा संकेश्वर- बांदा महामार्गबाधित शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन भुदरगड - आजराचे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, संकेश्वर- बांदा महामार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणास लागणाऱ्या जमिनीचे रितसर भुसंपादन करून मोबदला मिळावा यासाठी अनेकदा आंदोलन, मोर्चे, धरणे, बैठका झाल्या आहेत. मात्र कोणत्याही बैठकीचे इतिवृत्त संघटनेला मिळालेले नाही. ते तातडीने मिळावे. सार्वजनिक बांधकामकडे नोंद असलेल्या २००४ मध्ये वापरात असणाऱ्या रस्त्याची लांबी, रुंदीची माहिती मिळाली असून तो साडेपाच मीटर रुंदीचा रस्ता असल्याचे कळवले आहे. म्हणजे साडेसोळा फुट किंवा अठरा फुट रुंदीचा रस्ता सार्वजनिक बांधकामच्या ताब्यात असताना शेतकऱ्यांच्या जमिनीत रूंदीकरणासह काँक्रीटिकरण, मोरी व गटारी बांधणे अशी कामे केली जात आहेत. मात्र बाधीत शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस दिलेली अगर मोबदला दिलेला नाही. याबाबत लेखी अथवा तोंडी माहितीही दिलेली नाही. शेतकरी महामार्ग करण्याच्या विरोधात नाहीत पण त्याच्या हक्काची जमिन काढून घेतली जात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने बैठक लावावी. अन्यथा आंदोलन केले जाईल. जिल्हाधिकारी, अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक २ कोल्हापुर, यासह अन्य अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. महामार्ग बाधीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे, आनंदा येसणे, मारुती इंगळे, शंकर मोरबाळे, गणपती येसणे, शिवाजी कुंभार, अनिल शिंदे यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.