
पदवी परीक्षेत एकाच दिवशी ३२ ‘कॉपी’ केसेस
एकाच दिवशी सापडले ३२ कॉपीबहाद्दर
पदवी परीक्षाः आतापर्यंत एकूण ८१ जणांवर कारवाई
कोल्हापूर, ता. ३० ः शिवाजी विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांमधील कॉपी (गैरमार्गाचा अवलंब) करताना सापडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या परीक्षेत मंगळवारी एकाच दिवशी ३२ जणांना कॉपी करताना भरारी पथकाने पकडले. त्यात कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या परीक्षा सुरू होवून सहा दिवस पूर्ण झाले आहेत. त्यात आतापर्यंत एकूण ८१ विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत.
बी. ए., कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ डिझाईन, बी. कॉम., आर्टस अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन, इंटेरिअर डिझाईन, आदी विविध १२ पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन स्वरूपात मंगळवारी झाल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २८,२६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्या दरम्यान भरारी पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकूण ३२ कॉपी बहाद्दरांना पकडले. त्यांच्यावर परीक्षा प्रमाद समितीकडून विद्यापीठ नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा घालण्यासह नजर ठेवण्यासाठी परीक्षा मंडळाने कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यासाठी प्रत्येकी सहा भरारी पथके आणि प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक तैनात ठेवले आहे.