इचलकरंजीच्या वैभवास संवर्धनाची गरज

इचलकरंजीच्या वैभवास संवर्धनाची गरज

ich305,6,7,8.jpg
06015
१) स्त्री शिक्षणाची गुढी उभा केलेल्या अनुबाई कन्या विद्यमंदिर इमारतीस डागडुजीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
06016
२) पंचक्रोशीतील रुग्णांचा आधार बनलेल्या केईम रुग्णालयास आज आधाराची गरज आहे.
06017
३) दूरवस्थेत असलेला नदी घाट.
06018
४) कृत्रिम रंगाने रंगवलेले 200 वर्षापूर्वीचे शिव मंदिर (नदी घाट)
-------
लोगो ः बिग स्टोरी
संदीप जगताप
---------------
इचलकरंजीच्या वैभवास संवर्धनाची गरज

प्रत्येक शहराचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य असते. हे वैशिष्ट्य त्या शहराला इतर शहरांपासून वेगळे ठरवत असते. यामध्ये त्या शहरातील पुरातन इमारती, कलाकृती, स्थळे महत्त्वाची भूमिका निभावतात. या इमारतींच्या रचना शहराच्या वैभवाची आठवण करून देतात. असा हेरिटेज वास्तूचा खजिना इचलकरंजी शहरासही लाभला आहे. तब्बल १९ हेरीटेज वास्तू शहरात आहेत. सध्या या वास्तूंचे जतन करणे गरजेचे बनले आहे. तसेच त्यांची देखभाल दुरूस्ती करताना या इमारतींच्या मुळच्या सौंदर्यामध्ये बाधा येऊ नये, यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
--------
इचलकरंजी शहरात जहागिरदारांनी बांधलेल्या या भव्य व कलात्मक तसेच लोकोपयोगी वास्तू अजूनही त्या काळच्या वैभवाची व कलेची आठवण करून देतात. शहरातील १९ पुरातन वास्तूचा पुरातन वास्तू स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. या स्थळांना जिल्हा हेरीटेज समितीकडून भेट दिली होती. यावेळी पूरातन वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी समिती नेमणे, पुरातन वास्तू दत्तक देवून शासनाच्या निकषानुसार देखभाल व दुरूस्ती करणे यासारखे उपक्रम राबवणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा पुरातत्त्व समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र अद्याप या पुरातन वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. १९ वास्तू व्यतरिक्त अन्य वास्तू देखील कलेचा उत्तम नमूना आहेत. त्यांचे ही पुरातन वास्तू स्थळांच्या यादीत समावेशन होण्याची मागणी होत आहे. हेरिटेज दर्जामुळे त्या वास्तूची अधिक जागरुकपणे काळजी घेतली जाते. सध्या संवर्धनाच्या नावाखाली पुरातन वास्तूंचे मुळचे सौंदर्य बिघडवायचे काम सुरू आहे. या व्यतिरिक्त खाजगी मालकीच्या असलेल्या पुरातन इमारती पडण्यात येत आहेत. शहरातील अशाच काही वैभवशाली पण सध्या दूरवस्थेत असलेल्या हेरिटेज वास्तूंकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
---
राजवाडा - स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना
श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे (दुसरे) यांनी १८९२ मध्ये इचलकरंजी संस्थानाची अधिकृत सुत्रे घेतली. त्यापूर्वीच इचलकरंजीचा दर्शनीय राजवाडा बांधून पूर्ण केला. राजवाड्याला उंच ओवरहेड गेट असून खंदकांनी वेढलेली तटबंदी होती. राजवाड्याची भव्य इमारत इंडो-सारासोनिक स्थापत्य कलेतील आहे. राजवाड्याच्या भक्कम भिंतींना शोभणाऱ्या भव्य खिडक्या, पांढऱ्या रंगाचे डोकावणारे मनोरे, भव्य झुंबरे ही राजवाड्याची वैशिष्टये आहेत. राजवाड्याच्या छतावरुन शहर आणि इतरत्र ऊस, फळझाडांच्या बागा आणि दुरवरील क्षितीजावर डोंगर-टेकड्यांचा नजारा पूर्वी दिसत होता. राजवाड्याच्या परिसरामध्ये घोड्यांच्या पागा, व्यंकटराव शाळा, केशीराज नावाचे खेळाचे मैदान, पोलिस ठाण्याची दुमजली इमारत, आपटे वाचन मंदिराची इमारत होती. जे आजही स्थित आहे. राजवाड्याचे बांधकाम आजच्या आधुनिक काळात स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या या राजवाड्यात शैक्षणिक संस्था ज्ञान दानाचे कार्य करीत असल्याने राजवाडा सुस्थितीतीत आहे.
---
अनुबाई कन्या विद्यालय ः मुलींची पहिली शाळा, पण....
अनुबाई कन्या विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम हे राजवाड्याप्रमाणे आहे. अप्रतिम स्थापत्य कलेचा नमूना असलेली ही ऐतिहासिक इमारत जहागीरदार घोरपडे घराण्याचे निवासस्थान असल्याचे सांगण्यात येते. नंतरच्या काळात ज्ञानदानासाठी या वाड्यात प्राथमिक विद्यालय सुरू करण्यात आले होते. अनुबाई कन्या विद्यालय इमारत संस्थान कालावधीमधील असली तरी तिची पुरातन वास्तू स्थळांच्या यादीत समावेश नाही. त्यामुळे इतिहास प्रेमींमधून नाराजी उमटत असते. इचलकरंजी शहराच्या स्त्री शिक्षणाची गुढी या अनुबाई कन्या विद्यमंदिरात उभी राहिली. १८४२ मध्ये ज्योतिबा फुले यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला होता. या क्रांतिकारी निर्णयाचे अनुकरण करीत श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी १८७२ मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी अनुबाई कन्या प्राथमिक विद्यामंदिर सुरू केले. ही ऐतिहासिक इमारत आज अखेरच्या घटका मोजताना दिसते.
----------
हवामहल बंगला - पूववैभवाच्या प्रतिक्षेतील वास्तू
हवामहल नावावरुनच या इमारतीबाबत अंदाज लावता येतो. श्रीमंत घोरपडे सरकार यांनी विसाव्यासाठी राजवाड्यापासून थोड्या अंतरावर जंगलसदृश्य भागात या इमारतीची उभारणी केली. ही वास्तू बांधकामाचा अप्रतिम नमूना आहे. सध्या इमारतीवर जिल्हा परिषदेची मालकी आहे. या महालात तळमजल्यावर प्रांतकार्यालय तर वरच्या मजल्यावर शासकीय विश्रामगृह आहे. मात्र सध्या ही वास्तू दुरवस्थेत असून त्याची तज्ञांच्या मार्गदर्शनखाली डागडुजी होणे आवश्यक आहे.
-----
शिव मंदिर (नदी घाट) - २०० वर्षानंतरही भरभक्कम
पंचगंगा नदी तीरावर बांधलेले शिव मंदिर हे सुमारे दोनशे वर्षापूर्वीचे आहे. त्यांच्या बांधकामाच्या रचनेतून त्याचा कालावधीचा अंदाज मिळतो. या मंदिराचे बांधकाम सुमारे सहा वर्षे चालल्याचे इतिहास जाणकारांकडून सांगण्यात येते. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे १०८ शिवलिंग आहेत. तर नंदीच्या खाली ११ मारुतीच्या मुर्त्या कोरल्या आहेत. अनेक वेळा महापुराचा मारा सहन केलेले हे मंदिर आज ही भक्कम स्थितीत आहे. मात्र कृत्रिम कलरमुळे त्याचे सौंदर्य कमी झाले आहे.
-------
जुने जॅकवेल - १८७३ पासून अद्यापही वापरात
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १८७३ मध्ये ५५ फुट उंचीचे लंबवर्तुळाकार जॅकवेल बांधले होते. त्यानंतर १८७८ मध्ये या बांधकामात १२ फुट उंचीची भर करण्यात येवून वाफेचे इंजिन व पंप बसवले होते. पुन्हा १९२५ मध्ये डिझेल इंजिनचा वापर करुन जॅकवेल बांधला होता. या जॅकवेलचा वापर अद्याप सुरू आहे. त्यावरून या बांधकामचा दर्जा दिसून येतो.
------------
नदीघाट, समाधी, मनोरे, धर्मशाळा ः संस्थानकालीन ठेवा
मुळ घाट सर्वप्रथम १८२०-२१ मध्ये बांधला. ज्यामध्ये तीन पायऱ्यांच्या टप्प्यांचे बांधकाम होते. मात्र पंचगंगा नदीच्या कोरड्या हंगामात या पायऱ्‍यालगत पाणी पोहोचत नसल्यामुळे १९०७ मध्ये पुन्हा नव्याने घाटाच्या बांधकामात पायऱ्यांच्या टप्प्यांची भर केली. मात्र पुन्हा १९२३ मध्ये श्रीमंत गंगाबाई राणीसाहेब यांच्या खाजगी दहा हजार ३३७ रुपये खर्चातून घाटाचे वाढीव बांधकाम केले होते. श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे सरकार (जन्म २५ नोव्हेबर १८७०, मृत्यू २१ ऑक्टोबर १९४३), श्रीमंत अनुबाई व श्रीमंत गंगाबाई माईसाहेब यांच्या समाधी येथे स्थित आहेत. सोबत घाटावर मनोरे शहरात येणाऱ्‍या वाटसरूंना राहता यावे, यासाठी धर्मशाळा याची उभारणी केली होती. मात्र या पुरातन वास्तूंना कृत्रिम रंगरंगोटी करुन सजवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे मुळचे सौंदर्य गमावून बसल्याचे दिसत आहे.
--------
मरगुबाई मंदिर ः जुने जमिनदोस्त, नव्याने उभारणी
रोगराई शहराबाहेर रहावी, या आख्यायिकेनुसार प्रत्येक शहराच्या, गावाच्या वेशीवर मरगुबाईचे मंदिर असते. इचलकरंजी शहरातही संस्थान काळामध्ये उभारलेले मरगुबाई मंदिरास शहराच्या पुरातन वास्तू स्थळांच्या यादीत समावेश केला होता. मात्र सततच्या पुराच्या तडाख्यामुळे हे मंदीर जीर्ण झाले होते. त्याची भरभक्कम डागडुजी करण्याची आवश्यकता होती. तथापि, हे मंदिर जमीनदोस्त केले. सध्या येथे नवीन मंदिर उभारण्यात येत असले तरी पुरातन वास्तू स्थळांच्या यादीत असलेली इमारत पाडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न इतिहासप्रेमींकडून उपस्थित होत आहे.
--------
आदि व्यंकटराव शाळा ः शिक्षणाची मुहूर्तमेढ येथूनच
१८५५ मध्ये श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकारांनी उभारलेली आदी व्यंकटराव शाळेच्या ऐतिहासिक इमारतीस डागडुजी तर नाहीच उलट ती शाळा एका खासगी संस्थेला भाड्याने दिली आहे. इचलकरंजी संस्थांनाचा शिक्षणाचा पाया रावलेल्या या आदि व्यंकटराव विद्यामंदिर इमारतीस संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.
-----
शाळा क्रमांक २ ः बहुजनांच्या शिक्षणाची सुरुवात
जहागीरदार श्रीमंत गोविंदराव आबासाहेब घोरपडे यांनी बहुजनांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने १९ मार्च १८७४ रोजी शाळा क्रमांक २ या प्राथमिक शाळेची उभारणी केली. यावेळी येथे पहिले मुख्याध्यापक म्हणून गोविंद पांडुरंग कडेकर यांनी काम पहिले होते. सर्व जाती धर्माचे विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. त्यामधील अनेक विद्यार्थी अधिकारी बनून निवृत्त झाले आहेत. अनेकांचे भावनिक नाते जुळलेल्या या शाळा इमारतीचे अस्तीत्व भविष्यातही कायम राहण्याची गरज आहे.
------
केईम रुग्णालय - पंचक्रोशीतील रुग्णांचा आधार
१९११ नंतर इंग्लंडचे सातवे राजे एडवर्ड यांच्या स्मृत्यर्थ फंडातून हाकिंग एडवर्ड मेमोरियल उर्फ केईएम दवाखान्याची उभारणी केली होती. या दवाखान्याची कोनशिला २३ सप्टेबर १९१५ रोजी कोल्हापूरचे तत्कालीन रेसिडेंट लेफ्टनंट कर्नल एफ. डब्ल्यू. वुडहाउस यांच्याहस्ते बसवली होती. या दवाखान्यात रुग्णाची तपासणी, शस्त्रक्रिया व स्वतंत्र प्रसूती विभागही होता. त्यावेळी हा दवाखाना सुसज्ज व आधुनिक असा होता. १९५६ मध्ये हा दवाखाना नगरपालिकेच्या ताब्यात आला. कालांतराने दवाखान्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल असे नामकरण केले. या दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम पुर्णतः दगडामध्ये केलेले असून आजही भक्कम स्थितीत आहे. मात्र या इमारतीच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा येत आहे.
----
खासगी वास्तूंची जपणूक आवश्यक
इचलकरंजीस संस्थान लाभल्याने शहरात अनेक ठिकाणी पुरातन काळामध्ये बांधलेल्या वास्तु दिसून येतात. त्यामधील काही खासगी मालकीच्याही आहेत. या प्रत्येक इमारतीच्या बांधकामाच्या मागे शहराचा इतिहास दडलेला दिसतो. हा इतिहास जतन करुन पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी या हेरीटेज वास्तूचा योग्य पद्धतीने सांभाळ करणे आवश्यक बनले आहे. पण महापालिका प्रशासनाचे या हेरीटेज वास्तूंकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या वास्तूंचे बांधकाम जुने असले तरी आजही ते भक्कम स्थितीमध्ये उभे आहेत. काही दिवसांमागे काही वास्तूची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रयत्नात त्या पुरातन वास्तूच्या मुळ सौंदर्याला धक्का बसल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते.
----------
पुरातन वास्तूंच्या अस्तित्वाचा प्रश्न
शहरात जहागिरदार यांनी बांधलेल्या व स्थापत्य कलेचा उत्तम नमूना असलेल्या अनेक इमारती, स्थळे आहेत. त्यांच्याशी अनेकांचे भावनिक नाते जुळलेले आहे. अशा वास्तूच्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा ठराव मंजूर केल्याचे समजते. यामध्ये १५० वर्षापूर्वीच्या शाळेच्या इमारतीचाही समावेश होता. मात्र नागरिकांच्या विरोधाने ही योजना बारगळली आहे. त्यामुळे शहराच्या पुरातन वस्तूंच्या जतन- संवर्धन लांबच त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
---------
चौकट
इचलकरंजी शहरातील १९ हेरिटेज वस्तूंची यादी
राजवाडा, हवामहल बंगला, शाळा नंबर दोन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, गोविंदराव हायस्कूल, धाकटा वाडा, श्रीमंत घोरपडे सरकार स्मृतीस्थळ, गंगामाई गर्ल्स हायस्कूल इमारत, जेल इमारत (पुरवठा कार्यालय), मखदूम दर्गा, महादेव मंदीर, गणपती मंदिर (टिळक पुतळा परिसर), पंचगंगा नदी घाट, नदी घाट मनोरे, नदी घाट शिव मंदिर, जुने जॅकवेल, शाळा क्रमांक दोन, मरगुबाई मंदिर, कोर्ट इमारत आदि आहेत. तर मंगलधाम, मोठे तळे, नरसोबा कट्टा, तसेच ऐतिहासिक व्यवसाय वारसा म्हणून हातमाग हेरिटेज यादीत समाविष्ठ करणे आवश्यक आहे.
-----
वारसा दिवस साजरा करावा
१८ एप्रिलला जागतिक वारसा दिवस साजरा केला जातो. जगात असलेली ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसाचे संरक्षण व्हावे यासाठी जनजागृती दिवस साजरा केला जातो. या दिवशी हेरिटेज वॉक, फोटो वॉक आदींचे आयोजन केले जाते. इचलकरंजी शहरातही जागतिक वारसा दिवस साजरा करणे आवश्यक आहे. याद्वारे शहराचा इतिहास अनेकापर्यंत पोहोचेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------
इचलकरंजी शहराच्या वैभवाची ओळख या पुरातन वास्तूवरून होते. त्यामुळे या हेरिटेज वास्तूंचे संवर्धन अत्यावश्यक आहे. या पुरातन इमारती शाश्वत जीवनाचा भाग आहेत. शहरातील प्रत्येकाने आपल्या पूर्वजांचा इतिहास या वास्तूच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परदेशात आपण तेथील जुन्या इमारती पाहायला जातो. मात्र आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या अप्रतिम रचना असलेल्या वास्तू संवर्धनाकडे दुर्लक्ष करतो. पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी तज्ञमार्फत डागडूजी करणे आवश्यक आहे
-अमरजा निंबाळकर, अध्यक्षा, जिल्हा पुरातत्त्व समिती
-----------------
पुरातन वास्तू आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपल्या कला ज्ञान व एकात्मतेचा वारसा चालवीत असतात. त्यांना वर्तमानाशी जोडून घेण्यासाठी त्यांचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. या वास्तू पर्यावरणपूरक आहेत. त्यांचे आलंकरण रंगरांगोटीने नेत्रसुखद वाटले तरी ते त्या वास्तुसाठी नुकसानकारक असते. दगडी वास्तुची स्वच्छता करण्याचीही एक शास्त्रीय पद्धत असते. पाण्याऐवजी हवेचा वापर केल्याने त्या वास्तूची झीज कमी होण्यास मदत होते.
-वैशाली नायकवडे, मा. मुख्याध्यापिका
-----------------
शहरात असलेल्या पुरातन वास्तूचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. संवर्धनासाठी लागणारा निधी उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच अन्य शहरातील पुरातन वास्तू संवर्धनासाठी सरकारकडून निधी उपलब्ध होत असताना इचलकरंजी शहरासाठी का नाही. याबाबत महापालिका प्रशासनाची वेळकाढू भूमिका का ?. तसेच पुरातन वास्तूंना कृत्रिम कलर देणे, जिल्हा पुरातत्त्व समितीच्या निर्देशाविरुध्द्ध आहे. मात्र शहरातील अनेक वास्तूंना कलर देवून त्यांचे सौंदर्य बिघडवण्याचे काम झाले आहे.
-विजय जगताप, जेष्ठ नागरिक व माजी नगरसेवक
---------------------
महापालिकेच्या क्षेत्रातील हेरिटेज वास्तूच्या माहितीचे फलक लावण्याचे काम सुरू आहे. या वास्तूवर पुरातन विभागाकडून रोषणाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या हेरिटेज वास्तूंची डागडुजी, संवर्धन करण्यात येत आहे.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका इचलकरंजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com