गोकुळ संचालक भेट

गोकुळ संचालक भेट

०६०२१


‘गोकुळ’समोर दूध संकलन, उपपदार्थ निर्मितीचे आव्हान

नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे : २० टक्क्यांपर्यंत उपपदार्थ वाढवण्याचे प्रयत्न

कोल्हापूर, ता. ३१ : ‘जास्तीत जास्त दूध संकलन आणि उपपदार्थ निर्मिती’ हे गोकुळसमोरील मुख्य आव्हान आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक उपपदार्थांची निर्मिती झाली आहे. गोकुळ सध्या पाच टक्के उपपदार्थ निर्मिती करत आहे. भविष्यात ५ वरून २० टक्क्यांपर्यंत उपपदार्थ निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे नूतन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. श्री. डोंगळे आणि गोकुळ संचालकांनी आज ‘सकाळ’च्या उद्यमनगर येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ शॉपीसाठी अनेकांची मागणी आहे. शॉपी दिली तर बाजारात जेवढे जेवढे पदार्थ आहेत, ते सर्व पदार्थ शॉपीमध्ये मिळाले पाहिजेत. दूध, दही, ताक, लस्सी, सुगंधी लस्सी मिळेल; पण बाजारात जे जे दुग्धजन्य पदार्थ मिळतात ते सर्व पदार्थ असले पाहिजेत. यासाठी, गोकुळकडून सध्या सुरू असणाऱ्या ५ टक्के उपपदार्थ निर्मितीवरून ते २० टक्क्यांपर्यंत वाढवावे लागणार आहेत. यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केले जातील. सध्या दुधाला चांगले मार्केट आहे. मात्र, संघाला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल, तर उपपदार्थ निर्मितीशिवाय पर्याय नाही. तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे.’
संचालक अजित नरके म्हणाले, ‘सध्या लोकांची क्रयशक्ती वाढली आहे. चांगले काम, नोकरी करणारे कुटुंब दररोज दूध खरेदी करत आहेत. त्यामुळे दुधाला चांगली आणि मोठी मागणी आहे. आता उत्पादन आणि मागणीनुसार योग्य पुरवठा करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.’ यावेळी ज्येष्ठ संचालक बाबासाहेब चौगले, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, एस. आर. पाटील, कर्णसिंह गायकवाड, बयाजी शेळके, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com