
विकास आराखडा
२०४७ मधील कोल्हापूर राज्याला दिशादर्शक असावे
जिल्हाधिकारी रेखावार :जिल्ह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा तयार करा
कोल्हापूर, ता. ३१ : ‘जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्षेत्रातील परिपूर्ण आणि सक्षम आराखडा तयार करावा. उद्योग, संस्था व संघटना यांचे सर्व प्रतिनिधी व सर्व शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनी एकत्रित येवून विभागनिहाय विविध मुद्यांवर चर्चा करुन विश्लेषण करावे. यातून २०४७ पर्यंत कोल्हापूर जिल्हा कसा असावा आणि कसा असेल याची परिपूर्ण माहिती असणारा आराखडा तयार करावा. २०४७ मध्ये कोल्हापूर हे महाराष्ट्राला दिशादर्शक असेल असा आराखडा तयार करावा’, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले.
राज्य शासनाने २०४७ पर्यंतचा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात आज छत्रपती ताराराणी सभागृहात संबंधित शासकीय विभाग प्रमुख व विविध उद्योग, व्यावसायिकांच्या संघटनांची एकत्रित बैठक़ झाली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करत असताना जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यरत असणारे विविध उद्योग, संस्था व संघटना यांचे सर्व प्रतिनिधी व सर्व शासकीय यंत्रणेच्या प्रमुखांनी एकत्र आले पाहिजे. प्रत्येक विभागनिहाय विविध मुद्यांवर चर्चा करुन विश्लेषण केले पाहिजे. यासाठी संबंधित विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली त्या- त्या असोसिएशनच्या उपसमित्यांची स्थापना करावी. या उपसमित्यांनी आपआपल्या क्षेत्रातील संस्थांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींशी विकासासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करावी. चर्चा करुन संबंधित समित्यांनी याच आठवड्यात विश्लेषणात्मक अहवाल जिल्हास्तरीय समितीला पाठवला पाहिजे.’
ते पुढे म्हणाले, ‘जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी नियोजन करत असताना लघु, मध्यम व दीर्घ कालावधीचा विचार करावा. कमी वेळेत पाच वर्षे, मध्यम पंधरा वर्षे व दीर्घ कालावधीचा पंचवीस वर्षांचा आरखडा असावा. यानुसार शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा समितीने विचार करावा. सर्व उप समित्यांचा अहवाल मिळाल्यानंतर बैठक घेतली जाईल. यातून जिल्ह्याचा विकास आराखडा मंजूर करुन तो शासनाला सादर केला जाईल.’
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, संचालक आदित्य बेडेकर, बळीराम वराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, समितीचे समन्वयक संदेश जोशी उपस्थित होते.