रायगडावर जल्लोषात होणार शिवराज्योभिषेक सोहळा

रायगडावर जल्लोषात होणार शिवराज्योभिषेक सोहळा

रायगडावर रंगणार ३५० वा
शिवराज्याभिषेक सोहळा

साडेतीन लाख शिवभक्त जमणारः विविध उपक्रमांचे आयोजन


कोल्हापूर, ता. ३१ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दुर्गराज रायगडवर दरवर्षी साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन यंदा अधिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. ५ आणि ६ जून या कालावधीत रायगडावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशातून या सोहळ्यासाठी सुमारे साडेतीन लाख शिवभक्त येतील, असा अंदाज असून सर्वांची भोजन, न्याहारीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सावंत म्हणाले, ‘उत्सवाच्या नियोजनासाठी ४० जणांची समिती बनवण्यात आली असून प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा...स्वराज्याच्या इतिहासाचा’, ‘सोहळा पालखीचा,स्वराज्याच्या ऐक्याचा’ असे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. उत्सवमूर्तीवर ३५० सोन्याच्या होनाच्या प्रतिकृतींचा अभिषेक होणार आहे. स्वराज्यातील ३५० किल्ल्यांची नावे असणारे ध्वज घेऊन ध्वजपथक उत्सवात सहभागी होणार आहेत. राज्यभरातून शाहीर येथे येऊन पोवाडे सादर करतील. शिवकाळात जो राजमार्ग होता त्या नाणे दरवाजातून संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती रायगडावर येतील. विविध लोककलांचा जागर उत्सव काळात होणार आहे.’
पत्रकार परिषदेला विनायक फाळके, शाहीर आझाद नायकवडी, अमर पाटील, संपत पवार, उदय घोरपडे, तानाजी खोत, प्रकाश मोरबाळे उपस्थित होते.
------

अन्नछत्र व वाहतूक व्यवस्था

उत्सव काळात गडावर येणाऱ्या शिवभक्तांना भोजनाची सुविधा पुरवण्यासाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. तसेच गडावर कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी १० ॲरो प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच गडावर येण्यासाठी बसची मोफत शटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com