
अटल चषक फुटबॉल
लोगो - अटल चषक फुटबॉल स्पर्धा
06418
कोल्हापूर : तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा)
शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत
प्रॅक्टिस क्लबवर एक गोलने मात; संथ खेळामुळे शौकिनाच्या अपेक्षाभंग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने प्रॅक्टिस क्लबवर एक गोलने विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा चालू आहे.
शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब हे पारंपारिक प्रतिस्पर्धी मानले जातात. हा सामना रंगतदार होण अपेक्षित होते. दोन्ही संघाकडून सामना सुरू झाल्यानंतर फारशा चढाया झाल्याच नाहीत. तिसाव्या मिनिटाला शिवाजीच्या इंद्रजीत चौगले याने सिद्धेश साळुंखेच्या पासवर गोल करून संघास एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली. या दोन संघामधील सामना रंगतदार होणार असे शौकिनाची अपेक्षा होती. एक गोल झाल्यानंतर झाल्यानंतर शिवाजी तरुण मंडळाने संथ खेळ केला. मध्यंतरापर्यंत सामना एक शून्य अशा अवस्थेत होता.
उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टिसने रणनीती आखली. शॉर्ट पासिंगच्या जोरावर वेगवान खेळ करत खोलवर चढाया केल्या. प्रॅक्टिसचे प्रेम पोवार, शिवम पोवार, अर्जुन साळुंखे, राहुल पाटील, रोहित भोसले यांनी आक्रमक चढाई करून गोलची परतफेडसाठी जोरदार प्रयत्न केले. प्रॅक्टिसच्या राहुल पाटील यांच्या पासवर सागर चिले याने मारलेला जोरदार फटका मयुरेश चौगले याने अत्यंत शिताफीने अडवला. त्यानंतरही प्रॅक्टिसला मिळेलेली कॉर्नरकिक आणि फ्री किकचे फटके मयुरेश याने अत्यंत वेगवान हालचाल करून परतवून लावले. शिवाजी तरुण मंडळाला दुसरी गोल करायची संधी अनेक वेळा आली होती, परंतु फिनिशिंग अभावी आघाडीच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. उत्तरार्धामध्ये दोन्ही संघाकडून आक्रमक चढाया झाल्या, प्रॅक्टिसच्या चढाया रोखण्याचे काम मयुरेश उत्कृष्ठ केले. उलट शिवाजीच्या मंडळाचे खेळाडूंनी अंतिम क्षणालाही चेंडू पायात ठेवल्यामुळे दुसरा गोल करण्यात यश मिळाले नाही. निर्धारित वेळेत शिवाजी तरुण मंडळाने सामना एक शून्य अशा गोलनी जिंकला. ‘शिवाजी’कडून संकेत साळुंखे, करण चव्हाण, विक्रम शिंदे, संदेश कासार यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत वेगवान चढाई करत प्रॅक्टिसच्या खेळाडूंना जखडून ठेवले. शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत पोहोचला. उद्या शुक्रवारी (ता. १) पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. सामन्याचे मध्यंतराला संयोजकांकडून शिवाजी मंडळाचे जुने खेळाडू उदय भोसले, रमेश पाटील सुनील जाधव, धनाजी सूर्यवंशी आदींचा सत्कार करण्यात आला.
सामनावीर : मयुरेश चौगुले (शिवाजी तरुण मंडळ)
लढवय्या खेळाडू : प्रणव कणसे (प्रॅक्टिस)
आजचा सामना :
पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार दुपारी : चार वाजता