
चंदगडला नगरसेवक हळदणकरांचा उपोषणाचा इशारा
चंदगडला नगरसेवक हळदणकरांचा उपोषणाचा इशारा
निधी वळवल्याची तक्रार; वस्ती नसलेल्या ठिकाणी कामे धरल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २ ः येथील नगरपंचायतीने आमदार राजेश पाटील यांच्या शिफारशीनुसार मंजूर केलेल्या कामांचा निधी अन्यत्र वळवल्याची तक्रार नगरसेवक आनंद हळदणकर यांनी केली आहे. याबाबत योग्य निर्णय न झाल्यास २७ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा दिला आहे. नगरविकास विभागाकडे त्यांनी ही तक्रार केली आहे.
हळदणकर यांनी आमदार राजेश पाटील यांची शिफारस घेऊन आपल्या प्रभागातील कामांसाठी एक कोटी ५१ लाख ७५ हजारांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यासाठी कामे सुचवलेला जो प्रस्ताव दिला होता, त्याच्या अंदाजपत्रकानुसार संबंधित कामांसाठीच निधी खर्च करणे गरजेचे होते. परंतु नगरपंचायतीने मर्जीने त्यात बदल केला. फारशी वस्ती नाही, अशा ठिकाणी हा निधी वळवल्याची हळदणकर यांची तक्रार आहे. याबाबत म्हणणे मांडूनही बदल केला नाही. त्याची दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. निधी वापरण्याबाबतची कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करावी. ती न केल्यास आणि काम सुरू केल्यास २७ पासून आंदोलनाचा इशारा दिला.
------------
नगरपंचायतीने सुचवलेल्या कामांनाच नगर विकास खात्याकडून मंजूरी दिली जाते. शहराच्या विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून आम्ही निधीचा वापर केला आहे. विकासाबाबत सापत्नभाव केलेला नाही. टप्याटप्याने सर्वच प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-प्राची काणेकर,नगराध्यक्षा