
उस्ताद मिरजकर स्मृती संगीत सभा
06847
...
तालासुरांच्या गुरुशिष्यांचे बहारदार सादरीकरण
---
तबलाविभूषण बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतींना वंदन
कोल्हापूर, ता. ३ ः तबल्याचा तालबद्ध ठेका, सतारीचे मंजुळ तितकेच अवखळ सूर, शास्त्रीय संगीताच्या सुरेल ताणक्रिया अशा विविध तालसुरांच्या गुरूशिष्यांनी केलेल्या बहारदार सादरीकरणाने तबलाविभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. तबला गुरुकुल गडमुडशिंगीचे गुरू अतुल ताडे यांच्या शिष्यांचे तबलावादन, तर प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित चंद्रकांत लिमये यांचे सुरेल शास्त्रीय गायन आणि सतार वादक रफिक नादफ व शाफत नदाफ यांच्या सतारवादनाच्या संगीत मैफलीने रसिकांना तल्लीनतेची अनुभूती दिली.
तबला विभूषण बाबासाहेब मिरजकर एकावेळी १६ वाद्यांचे वादन करणारे वादक व शास्त्रीय नृत्याचे गुरू होते. त्यांचे देशभरात शिष्य आहेत. त्यांच्याकडेच तबला शिक्षण घेतलेले अतुल ताडे हेही प्रसिद्ध तबलावादक आहेत. त्यांनी आपल्या गुरूच्या नावाने तबला शिक्षण देणारे गुरुकुल स्थापन केले आहे. त्या गुरुकुलातर्फे तसेच उस्ताद मिरजकर यांच्या कन्या हेमसुवर्णा मिरजकर यांच्या सहयोगाने ही विशेष संगीत सभा घेण्यात आली. हेमसुवर्णा मिरजकर यांनी आपले वडील उस्ताद मिरजकर यांच्या संगीत कार्याच्या स्मृती जागविल्या, तसेच शिष्य श्री. ताडे नवे तबलावादक घडवत असल्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
संगीत सभेस सुरुवात गुरू श्री. ताडे यांचे शिष्य प्रशांत शेवाळे (कारदगा), पांडुरंग सुतार (मुगळी) व रविराज सुतार (धामोड) यांच्या तबलावादनाने झाली, त्यांना आनंद गुलगुजे यांनी संवादिनीची साथ केली.
यापाठोपाठ प्रसिद्ध शास्त्रीय गायक लिमये यांनी शास्त्रीय गायन केले. मालकंस रागात त्यांनी बंदीश सादर केली. उत्तम अलाप, नटखट हरकती, उत्कृष्ट ताणक्रिया अशा विविध गाणपैलूंचे त्यांनी उत्तम दर्शन घडविले.
प्रसिद्ध सतार वादक रफिक नदाफ व शाफत नदाफ यांच्या जादुई सतारवादनाने मैफलीचा कळासाध्याय गाठला. या दोन्ही कलावंतांनी सतारीतून मंजूळ तितक्याच अवखळ धून वाजवत रसिकांना थक्क केले.