जलतरण तलावाच्या खासगीकरणास विरोध

जलतरण तलावाच्या खासगीकरणास विरोध

लोगो ः ग्राऊंड रिपोर्ट
----------------
ich42,3.jpg
06933
इचलकरंजी : १) शंकरराव पुजारी जलतरण तलावामध्ये मुलांनी पोहण्याचा आनंद घेतला.
06934
२) भगतसिंग तलावाची दुर्दशा झाली आहे.

जलतरण तलावाच्या खासगीकरणास विरोध
इचलकरंजीत खेळाडू, नागरिक आंदोलनाच्या तयारीत; उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना आवश्यक

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ : शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या अनेक वास्तू शहरामध्ये आहेत. यामध्ये आवर्जून महापालिका मालकीच्या दोन जलतरण तलावांचा उल्लेख होतो. जलतरण तलावांमध्ये सराव करून अनेक खेळाडूंनी शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. मात्र आज या तलावांचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. यावर मार्ग काढत घोरपडे नाट्यगृहाजवळ असलेले शंकरराव पुजारी जलतरण तलाव खासगी कंपनीस देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. जलतरण तलावाचे खासगीकरण नको म्हणत खेळाडू व नागरिकांमधून विरोध होत आहे. यासाठी ते आंदोलनाचा मार्ग पत्करण्याच्याही तयारीत आहे. महापालिका व नागरिक यांच्यात होणाऱ्या संभाव्य संघर्षाबाबत ‘सकाळ’ने केलेला ग्राउंड रिपोर्ट...
------------
शहर परिसरातील मुले, नागरिकांना सुरक्षित पद्धतीने पोहण्यास शिकता यावे यासाठी महापालिकेने जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम भगतसिंग उद्यानाजवळील जलतरण तलाव १९९२ मध्ये बांधला. तलवामध्ये ३.५’, ८’, व १८ फूट खोल पाण्याची पातळी ठेवली होती. ज्यामुळे नव्याने पोहायला शिकणाऱ्या मुलांपासून पोहण्यात पारंगत असलेल्या नागरिकांसाठी त्याचा उपयोग होईल. त्यानंतर १९९९ मध्ये नाट्यगृहाजवळ बांधलेला शंकरराव पुजारी जलतरण तलाव हा खेळाडू व स्पर्धा यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केला. म्हणून याला ऑलंपिक दर्जाचा तलाव म्हणूनही ओळखण्यात येते. शहरातील या दोन्ही तलावांची रचना वेगवेगळी उद्दिष्ट्ये ठेवून केल्याचे पाहायला मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० पासून हा जलतरण तलाव बंद ठेवला होता. त्यामुळे या कालावधीत महापालिकेस सुमारे १ कोटी ४४ लाखांचे नुकसान सहन करावे लागले होते. या दोन्ही तलावांच्या देखभालीसाठी वर्षाकाठी आठ लाखांचा ठेका दिला होता. तलाव बंद असला तरी त्याची देखभाल दुरुस्ती वेळेवर करावी लागत आहे. तलावाचे पाणी निर्जंतुकीकरण करणे, पाणी बदलणे, तलावातील शेवाळ काढणे यांसह अन्य उपकरणांची देखभाल करावी लागते. मात्र भगतसिंग जलतरण तलावाची योग्य देखभाल न झाल्याने त्याची दुरवस्था झाली. तलाव कोरडे ठेवल्याने प्रखर उन्हाच्या माऱ्यामुळे तलावातील फरशांना तडे गेले आहेत. त्यामुळे हा तलाव बंद ठेवला आहे.
घोरपडे नाट्यगृहाजवळील शंकरराव पुजारी जलतरण तलाव हा सुस्थितीत असून तो सुरू आहे. त्यामुळे येथे खेळाडूंसह आबाल वृद्धांची गर्दी दिसून येते. त्यासोबत शाळांना सुट्या असल्याने नव्याने पोहायला शिकणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी सभासद वाढीमुळे बॅचेसची संख्या वाढवावी लागली आहे. जलतरण तलावामध्ये दिवसभरात आठशेहून अधिक नागरिक पोहण्यास येत आहेत.
शहरात एकमेव सुरू असलेला जलतरण तलावांसाठी महापालिकेस वर्षाकाठी ३५ लाख रुपये खर्च येत आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न हे २५ लाखांपर्यंत आहे. त्यामुळे दहा लाखांचा होणारा तोटा भरून काढण्याठी महापालिका प्रशासन हा तलाव खाजगी मक्तेदारांकडे चालवण्यास देण्याच्या प्रयत्नात आहे. यास नागरिकांमधून विरोध होताना दिसत आहे. नागरी सुविधा असलेने तलाव भाड्याने देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे. सध्या जलतरण तलावाची फीही मेट्रो सिटीच्या बरोबरीने आहे. तसेच दोन वर्षाने दहा टक्के वाढ करण्यात येते. महापालिकेचा होणारा तोटा भरून काढण्यासाठी अन्य मार्ग आहेत. मात्र खाजगीकरण केल्यास अनेकांचे नुकसान होणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
------------
जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी महत्त्‍वाचा
इचलकरंजी शहराची पंचगंगा नदी ही जलपर्णी, केंदाळ, रसायनयुक्त पाणी, मैलायुक्त पाण्यामुळे अतिशय प्रदूषित झाल्याने नदीमध्ये पोहण्यासाठी शहरातील नागरिक जाऊ शकत नाहीत. त्यांना जलतरण तलावमध्ये पोहणे आरोग्यदायी आहे. तसेच विहिरीमध्ये नव्याने पोहायला शिकणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जलतरण तलाव सर्वसामान्य नागरिकांपासून खेळाडूंसाठी महत्त्‍वाचा आहे. याचे खासगीकरण केल्यास फी वाढीसह अन्य नियम अटीमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होईल अशी धारणा आहे.
--------
शहरातील दोन्ही जलतरण तलावांच्या पाण्याची क्षमता
तलाव*लांबी-रुंदी*पाण्याची क्षमता
भगतसिंग*२५ फुट लांबी १५ फूट रुंदी*३५ लाख लिटर
पुजारी*५० फूट लांबी २४ फूट रुंदी*४० लाख ५० हजार लिटर
--------
डासांच्या निर्मितीसाठी तलाव
भगतसिंह उद्यानाजवळील जलतरण तलाव हा २०२० पासून बंद आहे. तलावास असलेल्या संरक्षण कठड्यास भगदाड पडले आहे. महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने तलावाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी साचून येथे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. परिणामी येथे राहणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
--------
खेळाडूच्या भवितव्याचा विचार करावा
कोल्हापूर महापालिकेने तसेच कागल नगरपालिका यांसह अन्य दोन तीन ठिकाणचे जलतरण तलावांचे खासगीकरण केले होते. मात्र थोड्या कालावधीतच ते बंद केले. अशी उदाहरणेसमोर असताना इचलकरंजी महापालिका प्रशासन खासगीकरण करण्यावर का अडले आहे. शहरातील खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करून खासगीकरण थांबवावे अशी मागणी होत आहे.
----------------
जलतरण तलाव खासगीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला सध्या आहे त्या पद्धतीने दर निर्धारित करूनच ठेका देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, खेळाडूंना कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.
-सचिन पाटील, इस्टेट विभागप्रमुख, मनपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com