
नाचणा बहरणार शंभर हेक्टरमध्ये
नाचणा बहरणार शंभर हेक्टरमध्ये
गडहिंग्लज तालुका : बियाणे देणार मोफत, प्रात्यक्षिकाद्वारे प्रोत्साहन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील १०० हेक्टरमध्ये आरोग्यदायी नाचणा बहरणार आहे. कृषी विभागाकडून त्याचा कृती आराखडा तयार केला असून ३५ हून अधिक शेतकर्यांना यंदा नाचण्याचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकर्यांना बियाणे मोफत दिले जाणार आहेत.शेतकरी या पिकाच्या उत्पादनाकडे वळावा यासाठी ही प्रोत्साहनात्मक योजना आहे.
आहारात नाचणा महत्वपूर्ण मानला जातो. सदृढ आरोग्यासाठीही नाचणीमध्ये विविध घटक अंतर्भूत आहेत. यामुळे नाचण्यापासूनची अनेक उत्पादने आज बाजारात उपलब्ध होतात. शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करीत आहे. त्या अंतर्गत तृणधान्याची लागवड वाढविण्याचे लक्ष्य कृषी विभागाला दिले आहे. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्या मार्गदर्शनाने विविध तृणधान्याचे प्रात्यक्षिक प्लॉट तालुक्यात घेण्यात येणार आहेत.
नाचण्याचे प्रात्यक्षिक हे त्यापैकीच एक. १०० हेक्टरमध्ये नाचण्याच्या प्रात्यक्षिकाचे नियोजन आहे. ३५ हून अधिक शेतकऱ्यांचा क्लस्टर तयार करुन हे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. हेक्टरी पाच किलोप्रमाणे फुले नाचणी हे चांगले वाण शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन आहे. तालुक्यात ६५० हेक्टरमध्ये नाचणा दरवर्षी घेतला जातो. महागावच्या दक्षिणेला नाचणा पिक घेणारे अधिकाधिक शेतकरी आहेत. पूर्व व पश्चिम भागात नाचणा अगदी नगण्यच पहायला मिळतो. म्हणून त्याचे उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने प्रात्यक्षिकाची प्रोत्साहन योजना आणली आहे.
दरम्यान, याशिवाय तालुक्यातील प्रत्येक गावात पाच-पाच गुंठ्याचे दोन तृणधान्य पीक संग्रहालयाचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहेत. रस्त्याकडेला किंवा वर्दळीच्या ठिकाणचे प्लॉट निश्चित केली जाणार आहेत. त्यामध्ये आहारामध्ये आरोग्यदायी असलेल्या नाचणी, बाजरी, वरई, राजगीरा, कोडो, ज्वारी अशा सहा प्रकारचे तृणधान्य पेरुन त्याचे उत्पादन घेतले जाणार आहे. तालुक्यात असे २१४ पीक संग्रहालयाचे नियोजन केले आहे.
------------
* शेतकऱ्यांनी स्वत: पुढे यावे...
नाचणा प्रात्यक्षिक, तृणधान्य पीक संग्रहालय याशिवाय सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन घेण्यासह भुईमूग, मुग, स्वतंत्रपणे तुरीचे उत्पादन घेण्याच्यादृष्टीने शेतकर्यांना मोफत बियाणांची योजना कृषी विभागाने आणली आहे. तुर ४ हेक्टर, मुगाचे १० हेक्टरमध्ये प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. भुईमुगाचे ३५ प्रात्यक्षिके आहेत. नाचणा पिकणार्या गावात नाचण्याची प्रात्यक्षिके आहेत. या सर्व प्रात्यक्षिकांसह तृणधान्य पीक संग्रहालयासाठी शेतकर्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.