लोकसभा राजकारण

लोकसभा राजकारण

राष्ट्रवादी, ठाकरे गटापेक्षा काँग्रेसला निवडणूक सोपी

कोल्हापूर लोकसभेचे राजकारण ः तीन आमदार, महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ ः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीसह शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसने जरी दावा सांगितला असला तरी सद्याच्या राजकीय स्थितीत काँग्रेसच्यादृष्टीने ही निवडणूक सोपी मानली जाते. मतदारसंघातील सहापैकी विधानसभेचे तीन तर विधान परिषदेचे दोन आमदार, महापालिका, जिल्हा परिषदेत असलेले जादा संख्याबळ पाहता काँग्रेसला जागा सोडली आणि राष्ट्रवादी व ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यास ही जागा जिंकण्यात काँग्रेसला अडचण दिसत नाही.
पुढील वर्षी होणऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. सत्तारूढ भाजपने केंद्रीय मंत्र्यांना काही मतदारसंघाची जबाबदारी दिली असून त्यातूनच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीनेही मुंबईत बैठक घेऊन जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर दावा सांगताना कोल्हापुरातून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव कोल्हापुरातून पुढे केले आहे तर दोन दिवसांपुर्वी काँग्रेसच्या राज्यस्तरीय बैठकीतही कोल्हापूर मतदारसंघावर हक्क सांगण्यात आला आहे. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष एकत्रित लढण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर मतदारसंघ कोणाला हे महत्त्वाचे असणार आहे.
सद्यस्थितीत भाजपसह दोन्ही काँग्रेस व ठाकरे गटाकडेही प्रबळ उमेदवार नाही. २०१९ च्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून विजयी झालेले जिल्ह्यातील दोन्ही खासदार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने सद्या शिंदे गटासोबत आहेत. २०२४ च्या निवडणुकीत हे दोघेही भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस व ठाकरे गटाला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.
काँग्रेसकडे जिल्हाध्यक्ष व विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासारखे तगडे नेतृत्‍व आहे. कोल्हापूर उत्तरसह दक्षिण, करवीरमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेतही काँग्रेस-राष्ट्रवादीला वर्चस्व मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. निवडणूक कोणतीही असो त्यात स्वतः उमदेवार नसले तरी झोकून देऊन काम करण्याची त्यांची पध्दत आहे. शिक्षक विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार द्या, निवडून आणल्याशिवाय रहात नाही, असे ओपन चॅलेंज देऊन त्यांनी ही जागा जिंकून दिली होती. त्यांच्या जोडीला आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, श्रीमती जयश्री जाधव, प्रा. जयंत आसगांवकर यांच्यासह शहर काँग्रेस, ‘गोकुळ’ ची सत्ता अशी तगडी फौज आहे. याचा विचार करता काँग्रेस या निवडणुकीत आव्हान उभे करू शकते.
राष्ट्रवादीत श्री. मुश्रीफ सोडल्यास लोकसभा लढवण्याची तयारी असलेला उमेदवार नाही. श्री. मुश्रीफ यांनाही लगेच लोकसभेला जायचे नाही, तसे अनेकदा त्यांनी बोलूनही दाखवले आहे. पण ‘महाविकास’ चा उमेदवार कोणीही असेल तर त्यामागे ते प्रामाणिकपणे आपली ताकद उभी करतील. ठाकरे गटाकडे तर ताकदीचा उमेदवार नाही, त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडेच ही जागा जाईल अशी शक्यता आहे.
..............

सतेज पाटील हुकमी उमेदवार

सद्यस्थितीत कोल्हापूरमधून काँग्रेसकडे बाजीराव खाडे यांच्या व्यतिरिक्त कोणी उमेदवारी मागितलेली नाही. पी. एन. यांनी सतेज यांचे तर सतेज यांनी पी. एन. यांचे नाव सुचवले आहे. पण तरूण चेहरा, मजबूत अर्थिक स्थिती, प्रभावी जनसंपर्क, मोठी यंत्रणा उभी करण्याची तयारी या पातळीवर सतेज पाटील हे हुकमी उमेदवार ठरू शकतात. विधान परिषदेच्या निमित्ताने जिल्हाभर त्यांनी तयार केलेले कार्यकर्त्यांचे जाळे ही त्यांची जमेची बाजू आहे. पक्षनिष्ठ म्हणून पी. एन. यांचीही उमेदवारी चालू शकते. सतेज यांनी जबाबदारी घेतल्यास काँग्रेसचा खासदार विजयी होऊ शकतो.
..............
ठाकरे यांची लवचिक भूमिका
ज्या मतदारसंघात आमचा प्रभावी उमेदवार नसेल तो मतदारसंघ आघाडीतील इतर पक्षांना सोडण्याची लवचिक भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे. त्याचाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चांगला फायदा होऊ शकतो. ठाकरे गटाकडे या मतदार संघात उमेदवारच नाही अशी स्थिती आहे.
...............

काँग्रेसची बलस्थाने

विधानसभा आमदार - ३
विधान परिषद आमदार - २
जिल्हा परिषद सदस्य - ४० पैकी १७, त्यातील १३ चिन्हावर
महापालिकेचे २५ नगरसेवक
उत्तर, दक्षिण, करवीरमध्ये मोठी ताकद
गोकुळ’ च्या सत्तेचाही फायदा शक्य
राष्ट्रवादी, ठाकरे गटाची साथ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com