
साहित्य संमेलन जोड
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन व्हावे
राजू शेट्टी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर साहित्यिक लिहित नाहीत
कोल्हापूर, ता. ४ ः ‘ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर साहित्यिक लिहित नाहीत. म्हणून आम्ही शेतकरी प्रश्नावर कसदार लेखन करण्यासाठी आमच्या नव्या पिढीतील शेतकऱ्यांतील लेखक, कवी, वाचक घडवू. त्याला लोकाश्रय देऊ. सरकारी पुरस्कार मिळाले नाही तरीही चालेल, पण जनतेतून त्यांना पुरस्कार मिळतील. यासोबत ग्रामीण साहित्यातील त्रुटी भरून निघाव्यात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन व्हावे, यासाठी हे साहित्य संमेलन आहे’, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
शेट्टी म्हणाले की, ‘प्रचिलित साहित्य संमेलनात शेतकऱ्यांच्या पसंतीचे कोणीही आजवर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नाही. आम्ही साहित्यिकांची पुस्तके विकत घेऊन वाचतो. त्याला दाद देतो. त्यामुळे आमच्या पसंतीचा एखादा साहीत्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावा, अशी मागणी केली तरी त्याची खिल्ली उडवली जाते. शेतकऱ्यांच्या ऊस, द्राक्ष उत्पादनावर साहित्यिकांची दुकाने चालली आहेत. तोट्याची शेती वर्षानुवर्षे शेतकरी करतो. त्याच्या प्रश्नावर लिहिले असते तर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असता. जगातील सर्वाधिक तोट्याचा धंदा करूनही शेतकरी शेती टिकवून ठेवतो. तुमची भूक भागवतो, त्या शेतकऱ्यांबाबत लिहिले जात नाही.’
...
नांगरट साहित्य संमेलनातील ठराव
१)बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या भूमिपुत्रांच्या आंदोलनाला हे संमेलन पाठिंबा देत आहे. गरज पडेल तेव्हा सर्व साहित्यिक शेतकऱ्यांसह मैदानात उतरतील तसेच शेतकऱ्यांची जमीन विकत घेणाऱ्याने दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत जर एखाद्या प्रकल्पाला जमीन विकली तर त्यातील निम्मी किंमत मूळ मालकाला मिळेल, असा कायदा विधिमंडळाने एकमताने संमत करावा.
२)कर्नाटकाच्या ताब्यात असणारी ८६५ मराठी गावे महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रावर दबाव आणावा. मराठी माणसाची सीमाभागातील गळचेपी थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला समज द्यावी.
३)दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या महिला पैलवान मुलींच्या आंदोलनास पहिले नांगरट साहित्य संमेलन संपूर्ण पाठिंबा देत आहे. या साऱ्या शेतकऱ्यांच्याच मुली आहेत. ब्रृजभूषणसिंह यांच्यावर कडक कारवाई करावी.