गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोळीबार
गोळीबार

गोळीबार

sakal_logo
By

सांगलीत भरवस्तीत
नगरसेवकाचा गोळीबार
दोघांतील वाद मिटवण्याचे कारण; आठ जणांविरोधात गुन्हा
सांगली, ता. ४ ः येथील शासकीय रुग्णालय परिसरात एका नगरसेवकाने शनिवारी रात्री हवेत गोळीबार केला. दोन मुलांच्या वादात पडल्याच्या कारणातून तरुणांच्या टोळक्याने नगरसेवक मयूरेश पाटील यांच्या हॉटेल आणि गाडीवर दगडफेक केली. तसेच त्यांच्यावर लोखंडी रॉड, चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगवण्यासाठी पाटील यांनी दोन राउंड हवेत फायर केले.
या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात तक्रार दिली. फिर्यादीत समीर रसूल कटकेवाडी, अनिकेत आकाशदीप साबळे, बंडू केंगार, रियाज अपरासे यांच्यासह सात ते आठ अनोळखींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शासकीय रुग्णालयासमोरील गल्लीत नगरसेवक पाटील यांचे एमपी लॉज आहे. जेवण करून पाटील हॉटेलसमोर शतपावली करत होते. यावेळी एका मेडिकल दुकानासमोर दोन मुले भांडत होती. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी पाटील गेले असता त्यातील एकाने त्यांची कॉलर धरून तू आमच्यामध्ये का पडला आहेस, असे म्हणत धारदार हत्यार काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. माफी मागून प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मयूर पाटील घरी आले असता बंडू केंगार याचा दूरध्वनी आला. आमच्या पोरांना पोलिस ठाण्यात नेऊन मारहाण केली. हे चुकीचे केले, असे केंगार म्हणाला. त्याने फोन रियाजकडे दिला. त्यानेही, ‘हे काय बरोबर नाही, तुम्ही कशाला मध्ये पडला,’ असे म्हटले असता पाटील यांनी ‘उद्या सकाळी बोलूया’, असे म्हणत फोन ठेवला.
रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित आठ ते दहा जण आले. त्यांनी लॉजवर दगडफेक केली. लॉज कर्मचाऱ्यांनी याची माहिती पाटील यांना दिली. पाटील परवानाधारी रिव्हॉल्व्हर घेऊन लॉजकडे धावले. लॉजजवळ आले असता दोन अल्पवयीन मुलांनी आम्हाला मारले आहे, त्यांना सोडू नका, असे म्हणत लोखंडी रॉड, चाकू आणि दगड घेऊन पाटील यांच्या दिशेने आले. यावेळी पाटील यांनी रिव्हॉल्व्हरमधून एक राउंड हवेत गोळी झाडली. यावेळी जमावाने पुन्हा हॉटेलच्या दिशेने दगडफेक केली. पाटील आणि कामगार हॉटेलमध्ये गेले. याचवेळी विशाल कलगुटगी या कर्मचाऱ्याला जमावाने पकडून मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी पाटील यांनी लॉजमधून पुन्हा एक राउंड हवेत फायर केला. सिव्हिल परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या बिट मार्शलना गोळीबाराचा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे पाहून राडा घालणारा जमाव तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. सांगलीत गोळीबार झाल्याच्या घटनेने शहर हादरून गेले.
...
नगरसेवक पाटील यांच्यावर गुन्हा
मयूर पाटील यांनी हवेत दोनदा गोळीबार केला. अग्निशस्त्र काढून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबद्दल शहर पोलिस ठाण्यात पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी सांगितले.