अटल चषक  फुटबॉल

अटल चषक फुटबॉल

07104, 07105,
अटल चषक शिवाजी तरुण मंडळाकडे
पाटाकडील तालीमचा तीन गोलने एकतर्फी पराभव; पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. ४ : तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने तुल्यबळ पाटाकडील तालीमचा तीन गोलने  एकतर्फी  पराभव करीत अटल चषकावर नाव कोरले. अतिशय वेगवान आणि रंगतदार सामन्यात शिवाजी तरुण मंडळने  सामन्याच्या उत्तराधार्थ तीन गोल केल्यानंतर फुटबॉल शौकिनांनी अक्षरशः जल्लोष केला. या विजयामुळे शिवाजी तरुण मंडळ केएसएच्या गुणांकनात अव्वल ठरले आहे.
छत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत दोन्ही संघ जिंकण्याचे इर्षेने मैदानात उतरले होते. सामन्याच्या सुरवातीला काही मिनिटातच शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंदरेने कॉर्नर किकवर गोल करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर पाटाकडीलकडून आदित्य कल्लोळी, रोहित देसाई,ओमकार मोरे,  प्रतीक बदामे, रोहित देसाई यांनी जोरदार चढाया केल्या. परंतु,  शिवाजी तरुण मंडळाची मजबूत बचावफळी  व  गोलरक्षक मयूरेश चौगुले याने त्या कौशल्याने परतवून लावल्या. सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत होता.  
उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाकडून सिद्धेश साळोखे, विशाल पाटील, विक्रम शिंदे, जय कामत, योगेश कदम, संदेश कासार, इंद्रजित चौगुले आणि करण चव्हाण बंदरे यांनी उत्कृष्ट खेळी करत वारंवार चढाया केल्या. सामन्याच्या ४४ व्या मिनिटास शिवाजी तरुण मंडळाच्या संदेश कासारच्या पासवर करण चव्हाण बंदरेने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. दरम्यान  ७८ व्या मिनिटास शिवाजीच्या सिद्धेश साळोखेने चेंडूवर ताबा मिळवला आणि मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली.  या गोलनंतर पाटाकडीलच्या  ऋषिकेश मेथे पाटील, सोमाडी यांनीही  वेगवान चाली रचत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याउलट शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंदरे ८१ व्या मिनिटाला सिद्धेश साळोखेच्या पासवर अप्रतिम गोल करीत शिवाजीची आघाडी ३-० अशी भक्कम केली. शिवाजी तरुण मंडळाकडून संदेश कासार, इंद्रजित चौगुले यांनी पूर्वार्ध संपण्यास काही काळ उरला असताना  जोरदार मुसंडी मारली.  मात्र, पाटाकडीलचा गोलरक्षक शब्बीर गणी याने  हे फटके  हाताने पंच करून बाहेर काढले.
अखेरीस शिवाजी तरुण मंडळाकडून ३-० अशा गोलसंख्येवर सामना जिंकला. विजेत्या संघास पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते २ लाख ५५ हजार आणि चषक, तर उपविजेत्या पाटाकडील तालीम मंडळास १ लाख ५५ हजार आणि चषक प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, के.एस.ए.चे अध्यक्ष मालोजीराजे, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सचिव अशोक देसाई, उपाध्यक्ष विजय जाधव,  ॲड धनंजय पठाडे,  राजू जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, गणेश देसाई आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट खेळाडू असे
07106
फॉरवर्ड- आदित्य कल्लोळी (पाटाकडील)
-
07107
हाफ- ऋतुराज सूर्यवंशी (शिवाजी तरुण मंडळ)
-
07108
डिफेन्स- अक्षय पायमल (पाटाकडील)
-
07109
गोलरक्षक- मयूरेश चौगुले ( शिवाजी तरुण मंडळ)
---
07110 ः मालिकावीर - करण चव्हाण बंदरे ( शिवाजी तरुण मंडळ)
-------
सामन्यातील लढवय्या खेळाडू - रोहीत देसाई (पाटाकडील)
सामनावीर- विशाल पाटील (शिवाजी तरुण मंडळ)

दृष्टिक्षेपात सामना
-मैदानावर महिला आणि मुलींची मोठी उपास्थिती. शिवाजी तरुण मंडळाच्या गोलनंतर मुलींनी तिरंगा फडकावत जल्लोष केला.  
-मैदानावर  धुसमुसळा खेळ करून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार, मुख्य पंचानी मध्यस्थी करून दिली ताकीद
-तिघा खेळाडूंना रेड कार्ड,  सुयश हांडे सुमित जाधव रोहित आडनाईक यांना दोन दोन यलो कार्ड झाल्याने रेड कार्ड  मिळाले 

चौकट
मारहाण झाल्याची अफवा अन् पळापळ
दोन गोल झाल्यानंतर मैदानावरील कोणीतरी गॅलरीकडे अश्लील हावभाव केल्याच्या आरोप करत  पाटाकडील समर्थक  प्रेक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला. काही जणांनी बाटल्याही पॅव्हिलियनच्या दिशेने फेकून मारल्या. संयोजकांनी शांततेचे आवाहन करूनही प्रेक्षक शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. याच कारांवरून पोलिसांनी सर्व संयोजक आणि उपस्थित कार्यकर्त्यांना मैदानावरून बाहेर काढले. त्यानंतर केएसए कार्यालयाजवळ  गेलेल्या काही युवकांना मारहाण झाल्याची अफवा उठली आणि पळापळ सुरु झाली. त्यामुळे पोलिसांनी धाव घेऊन बळाचा वापर करून लोकांना पांगवले आणि शांतता प्रस्थापित केली.

शिवाजी मंडळ केएसएच्या मानांकनात प्रथम स्थानी
शिवाजी तरूण मंडळ वरिष्ठ संघांच्या मानांकनात प्रथम स्थानी आले. के.एस.ए. वरिष्ठ लीग साखळी स्पर्धा ते अटल चषक फुटबॉल स्पर्धा या दरम्यानच्या स्पर्धा गुण टक्केवारीनुसार शिवाजी मंडळ प्रथम ठरले आहे. ही गुणांची क्रमवारी पुढीलप्रमाणे ( कंसात मिळालेले गुण )
शिवाजी तरूण मंडळ(४२.५) प्रथम, , दिलबहार तालीम मंडळ(अ) द्वितीय (३५), खंडोबा तालीम मंडळ (अ), तृतीय (३४), बालगोपाल तालीम मंडळ, चतुर्थ ( ३१), प्रॅक्टीस फुटबाॅल क्लब(अ), पाचवा, (३०), पाटाकडील तालीम मंडळ,सहावा(२९.५), संयुक्त जुना बुधवार पेठ , सातवा ( २८), फुलेवाडी क्रीडा मंडळ , आठवा(२४) झुंजार क्लब, नववा(२०), बी.जी.एम. स्पोर्टस, दहावा (१७), संध्यामठ तरूण मंडळ, अकरावा ( १३), उत्तरेश्वर प्रासादीक , बारावा ( १२), सम्राटनगर स्पोटर्स, तेरावा (१०), कोल्हापूर पोलिस, चौदावा ( ०९), सोल्जर्स ग्रुप, पंधरावा (०६), पाटाकडील तालीम मंडळ (ब) सोळावा ( ०६).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com