
इचलकरंजीत डस्टबिनला चोरीचे ग्रहण
ich54.jpg
07277
इचलकरंजी : डस्टबिन महानगर पालिका कंपाउंडच्या भिंतीलाच टेकवून ठेवले होते. त्यामधील बकेटची चोरी केली आहे.
-------
इचलकरंजीत डस्टबिनला चोरीचे ग्रहण
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; ‘सकाळ’ने लक्ष वेधूनही कानाडोळा
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ : इचलकरंजी शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान व राज्य सरकारचे माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न होत असतात. महापालिका प्रशासन विविध प्रकारे उपाययोजना करीत असते. त्यामधूनच शहर कोंडाळा मुक्त करण्यासाठी विविध ठिकाणी प्लास्टिक व स्टीलचे डस्टबिन बसवले आहेत. मात्र या डस्टबिनमधील कचरा साठविण्यासाठी असलेल्या बकेट चोरी होत आहे. त्यामुळे कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. दरम्यान याबाबत फोटोफिचरच्या माध्यमातून ‘सकाळ’ने महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
शहरात फिरणाऱ्या नागरिकांकडून होणारा कचरा रस्त्यावर पडून परिसर अस्वच्छ होवू नये यासाठी इचलकरंजी महापालिकेने डस्टबिन बसवले आहे. प्रथम ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी फायबरच्या वेगवेगळ्या बकेट ठेवल्या होत्या. त्या वेळेपूर्वी खराब होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्या जागी स्टीलचे डस्टबिन बसवले. महापालिकेने फायबरची १५० तर स्टीलची १२५ डस्टबिन खरेदी केली होती. स्टील डस्टबिन कमर्शिल ठिकाणी केवळ सुका कचऱ्याकरिता बसवली होती. मात्र सध्या या डस्टबिनची चोरी होत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून केलेली डस्टबिनची खरेदी उधळण ठरत आहे.
इचलकरंजी शहरामध्ये ओला व सुका असा एकून कचरा दररोज सुमारे १२० टन कचरा गोळा होतो. त्यामध्ये घरगुती होणाऱ्या कचऱ्यासाठी घंटा गाडीची व्यवस्था केली आहे. मात्र पाण्याच्या बॉटल, बंद पाकीटातील खाद्य पदार्थ, यासोबत नागरिकांकडून होणारा अन्य कचरा साठवण्यासाठी महापालिकेने डस्टबिनची व्यवस्था केली आहे. सध्या मात्र हे डस्टबिन उखडून पडलेल्या अवस्थेत दिसतात. शहरात गॅस पाईपलाइनसाठी खुदाई होत असताना अडथळा ठरणाऱ्या डस्टबिन काढून ठेवल्या आहेत. त्या रस्त्याकडेलाच बराच कालावधी पडून राहिल्याने डस्टबिनमधील बकेटांवर चोरटे डल्ला मारत आहेत. महापालिकेचे लाखो रुपयाचे नुकसान होण्याआधी डस्टबिन पुन्हा लावणे आवश्यक बनले आहे.
----------
डस्टबिन बसविण्यासाठी आंदोलन
स्टीलचे डस्टबिन खरेदी करून घोरपडे नाट्यगृहाच्या जागेमध्ये ठेवले होते. येथे सुमारे एक वर्षभर पडून खराब होण्याच्या मार्गावर होते. यावेळी नागरिकांनी महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियाद्वारे आंदोलन छेडले होते. त्यानंतर स्टीलचे डस्टबिन बसवले होते.
---------
डस्टबिन खरेदी दृष्टीक्षेप
डस्टबिन* संख्या * किमत
फायबर डस्टबिन* १५० * सुमारे ४० लाख
स्टील डस्टबिन* १५० * सुमारे ३० लाख
----------
गॅस पाईपलाइनवेळी काढण्यात आलेले डस्टबिन संबंधित आरोग्यनिरीक्षकांना सुरक्षितस्थळी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
-सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, महापालिका