
मंगेश चिवटे यांचा प्रेस क्लबमध्ये वार्तालाप
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता
कक्ष रुग्णांना आधारवडःचिवटे
योजनेत गैरप्रकार झाल्याचे दिसल्यास कारवाई
कोल्हापूर, ता. ५ : दुर्धर आजार, अन्य वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यातील रुग्णांना आधारवड बनला आहे. जर यात काही गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालयांना या योजनेतून कायमचे रद्द करण्यासह त्यांच्यावर आणि त्यांना गैरप्रकारात मदत करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,’’ असा इशारा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिला.
कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये चिवटे यांचा वार्तालाप कार्यक्रम झाला. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे अध्यक्षस्थानी होते. चिवटे म्हणाले, ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी १७ मार्च २०१५ ला अस्तित्वात आला. काही काळ ही योजना बंद झाली होती; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ही योजना पुनर्जीवित केली. ११ महिन्यांच्या काळात या योजनेच्या माध्यमातून ७१ कोटी ६८ लाखांचा निधी दिला. त्यामुळे ९ लाख ६ हजार ९९९ रुग्णांना लाभ मिळाला. कर्करोगासह सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण, हृदयविकार, गुडघ्यांवरील उपचार, अपघात, भाजणे, विद्युत अपघात, लहान बालकांचे आजार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे विकार अशा आजारांसाठी ५० हजार ते २ लाखांचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेतून दिले जाते. गरजू लोकांनी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या माध्यमातून कुस्तीपटूंना लेगामेंट इंजुरीकरीता अर्थसाह्य केल जाणार आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य संपर्क प्रमुख जितेंद्र सातव, संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांच्यासह संचालक, पत्रकार उपस्थित होते.