राज्याभिषेक सोहळा

राज्याभिषेक सोहळा

शिवभक्तांनी रायगड मंतरलेला
शिवराज्याभिषेकदिनाचा आज सोहळा
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
रायगड, ता.५ : शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी बाहु स्फुरल्या, हलगीच्या कडकडाटावर लाठी वाऱ्यासारखी फिरली, डोक्यावरील चक्रीने शिवभक्तांचे डोळे भिरभिरले अन् शिवकालीन युद्धकलेचा वारसा जपणाऱ्यांचा ऊर अभिमानाने फुलून आला. ‌शिवराज्याभिषेकास तीनशे पन्नासावे वर्ष सुरू होत असताना,‌ होळीच्या माळावर युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्याचा मिळालेला मान त्यांच्यासाठी अत्युच्य क्षण ठरला. तब्बल अडीच तास युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी शिवभक्तांना जागेवर खिळवले. निमित्त होते अखिल भारतीय मराठा महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे.
दरम्यान, शिवभक्तांच्या उत्साहाला शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला उधाण आले. रात्री उशिरापर्यंत शाहिरांनी डफ, तुणतुणे व ढोलकीच्या ठेक्यावर पोवाडे सादर करत शिवशौर्याचा जागर घातला.
खांद्यावर भगवा झेंडा, डोक्यावर भगवी टोपी, कपाळाला अष्टगंध लावून शिवभक्त गडावर सकाळपासून येत होते. दुपारी रणरणत्या उन्हात त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. चित्त दरवाजा, महादरवाजा ते हत्ती तलावापर्यंत येताना त्यांचे शरीर घामाने चिंब झाले तरी कधी एकदा गड पाहतो, ही आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ‘धार तलवारीची...युद्धकला महाराष्ट्राची,''उपक्रमाची तयारी सकाळपासून सुरू होती.
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांना सुरुवात होताच रणवाद्य हलगीचा कडकडाट झाला. लाठी चक्राकार गतीने भिरभिरू लागली. बाल मावळ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकांतून उपस्थितांची मने जिंकली. वस्ताद पंडित पोवार, संदीप सावंत, प्रदीप थोरवत, युवराज पाटील, विनोद साळोखे, जितेंद्र पवार, रवींद्र जगदाळे, अमित गडांकुश, योगेश पाटील यांच्यासह अन्य वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. याचवेळी गडपायथ्याखालून चालत युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती गडावर पोहोचले. शिवभक्तांच्या उत्साहाला जोर चढला. संभाजीराजे यांनी युद्धकलेची प्रात्यक्षिकांचा थरार पाहत खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या वेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते.

गडावर घुमला शाहिरी जागर.‌..
''जागर शाहिरांचा..हिंदवी स्वराज्याचा,'' हा कार्यक्रम उत्साह वाढवणारा ठरला. महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांनी भेदक शाहिरी सादर करत शिवभक्तांच्या अंगावर रोमांच उभे केले. शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी, देवानंद माळी, दिलीप सावंत, सुरेश जाधव, राजेंद्र कांबळे, यशवंत जाधव, अजिंक्य लिंगायत, स्वप्निल डुंबरे, गणेश गलांडे, पृथ्वीराज माळी यांनी यात सहभाग नोंदवला. रात्री उशिरापर्यंत राजसदरेवर शाहिरांच्या पोवाड्यांवर शिवभक्त थिरकत राहिले.‌ गडावर शिरकाई देवीच्या गोंधळात शिवभक्त उत्साहाने सहभागी झाले.

क्षणचित्रे.....
* दिंडनेर्लीच्या आऊबाई भाऊ पाटील वयाच्या ७९ व्या वर्षी गडावर पायी दाखल
* होळीच्या माळावर बसून संभाजीराजे, संयोगिताराजे व शहाजीराजे यांनी शिवकालीन युद्धकलेचा अनुभवला थरार
* मानवंदनेत राज्यातील एकोणतीस आखाड्यांचा सहभाग
* अन्नछत्राच्या परिसरात शिवभक्तांच्या रांगा
* होळीच्या माळावर स्क्रिन
* बाजारपेठ, राजदरबार, जगदीश्वर मंदिर, हत्ती तलाव परिसरात शिवभक्तांची वस्ती
* रात्रंदिवस जेवणाची व्यवस्था
* शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून गडावर स्वच्छता

आजचे कार्यक्रम असे :
सकाळी ६ - ध्वजपूजन, ध्वजारोहण व जयघोष रणवाद्यांचा. स्थळ : नगारखाना.
६ : ५० - शाहिरी कार्यक्रम, स्थळ : राज दरबार
९ : ३० - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन. स्थळ : राजसदर
९ : ५० - युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत व मिरवणुकीने राजसदरेवर आगमन.
१० : १० - युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक
१० : २० - मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण होनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक
१० : २५ - प्रास्ताविक : अध्यक्ष, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती
१० : ३० - युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन
११ : ०० - ''सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा'' शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ
दुपारी १२ : ०० - जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप
१२ : १० - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस अभिवादन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com