शिवराज्याभिषेक दिन एकत्रितपणे

शिवराज्याभिषेक दिन एकत्रितपणे

शिवराययांचा अखंड जयघोष
व्याख्याने, स्पर्धांसह विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळा
ीीसकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहर आणि परिसरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. भव्य मिरवणूकीबरोबरच विविध शाळा, महाविद्यालये, संघटना व संस्थांतर्फे अभिवादनाबरोबरच स्पर्धा, व्याख्याने, आतषबाजी, प्रसाद वाटप आदी कार्यक्रमांवर भर देण्यात आला.


07538
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत उपस्थित अधिकारी.

शिवाजी विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठात शिव-राज्याभिषेक दिन छत्रपती शिवरायांच्या जयघोषात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. सनईच्या सुरांमुळे आज सकाळपासूनच विद्यापीठातील वातावरण प्रसन्न बनले होते. सकाळी साडेआठ वाजल्यापासून विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळा परिसरात पोवाडे लावले होते. सकाळी ठीक साडेनऊ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवज्योत प्रज्वलित करून शिवज्योत रॅलीस प्रारंभ झाला. मुख्य प्रशासकीय इमारतीपासून परीक्षा भवन, आरोग्य केंद्र, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, कन्झ्युमर स्टोअर, विद्यार्थिनी वसतिगृह, भूगोल अधिविभाग अशी पुन्हा मुख्य इमारत परिसरात दाखल झाली. येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ढोल, हलगीच्या तालावर लेझीमचे सादरीकरण केले. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात शिवपुतळ्याच्या प्रतिकृतीस कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले. मूळ पुतळ्यासही पुष्प वाहून अभिवादन केले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर केले.
या उपक्रमात कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, राज्य कर्मचारी महासंघाचे महासचिव मिलींद भोसले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कमला कॉलेज
कमला कॉलेजमध्ये विद्यार्थिनींनी शिवप्रतिमेभोवती आकर्षक रांगोळी काढली. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उप-प्राचार्य एम. एन. जाधव, प्रा. डॉ. अनिल घस्ते, प्रा. डॉ. सुजय पाटील, प्रा. डॉ. नीता धुमाळ, प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, तानाजी कांबळे, महेंद्र कंग्राळकर, प्रताप रंगापूरे, संदिप गावडे, सुहास बरगाले, जोतिराम मोटे, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून रायगडावर स्वच्छता मोहीम
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील पावणे दोनशेहून अधिक स्वयंसेवकांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक दिना निमित्त दुर्गराज रायगडावर स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्ती अभियान आणि वाहतूक नियंत्रणासाठी मदत केली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, इतर अधिकाऱ्यांनी रायगडावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभागाचे विद्यापीठस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिर दोन जून ते आठ जून कालावधीत सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्त विशेष संस्कार शिबिर होत आहे. शिबिरांतर्गत शिवाजी विद्यापीठात आणि किल्ले रायगडवर विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम प्लास्टिक मुक्ती अभियान राबवले. सुमारे १३ हजार किलोहून अधिक केरकचरा प्लास्टिक विद्यार्थ्यांनी गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक कचऱ्यांची ९० हून अधिक पोती संकलित करून त्याच्या पुनरुत्पादनासाठी तो एकत्रित करून ठेवला. किल्ले रायगडावर विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.
डॉ. शिर्के यांनी छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन जीवनात वाटचाल करावी, असे आवाहन केले. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डॉ. डी. आर. मोरे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, एन.एस.एस विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले, रंजीतसिंह भोसले, प्रशासकीय अधिकारी एस. एम. पालकर उपस्थित होते. डॉ. के. एम. देसाई, डॉ. ए. बी. बलुगडे, डॉ. संदीप पाटील, डॉ. कुलकर्णी, डॉ. सयाजीराव, डॉ. संग्राम मोरे, प्रा. आशुतोष मगदूम, एस. ए. मुंडे, डॉ. पी. बी. पाटील यांनी संयोजन केले.डॉ. केदार फाळके, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी व्याख्याने दिली. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे प्रोत्साहन मिळाले. डॉ. टी. एम. चौगुले, डॉ. के. एम. देसाई, डॉ. बलुगडे यांनी संयोजन केले. डॉ. पी. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी आभार मानले.


ब्राह्मण सभेतर्फे राज्याभिषेक सोहळा
ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे ज्येष्ठ संचालक नंदकुमार मराठे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांनी पुष्पवृष्टी केली. शिवरायांची आरती केली. संस्थेच्या प्रांगणात मांडव उभा केला. मराठे यांनी शिव राज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यवाह श्रीकांत लिमये, खजानिस रामचंद्र टोपकर, संचालक अशोक कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, व्यवस्थापक अशोक जोशी, संस्थेचे सभासद सतीश आंबर्डेकर, रमेश सखदेव, संस्थेचे सर्व सहकारी उपस्थित होते. उपस्थित शिवप्रेमींना मिठाई देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. श्री. लिमये यांनी आभार मानले.


07402
सुहास राजे ठोंबरे आखाडा
शिवाजी पेठेतील श्री खंडोबा-वेताळच्या मर्दानी राजा सुहास राजे ठोंबरे आखाड्यातर्फे राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येस रंकाळ्याच्या काठावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. मावळा शाहीर मिलिंदा सावंत यांनी राज्याभिषेक माहिती तर शाहिरी कवणे सादर केली. वस्ताद बाळासाहेब शिकलगार, किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूराज, शिवतेज, शिवबा नाना, केदार, विश्वजीत, आदित्य, रुद्रांश, साईश, श्रीराज, इंद्रनील
विरांगणा, शिवानी, अदिती, मनीषा, सिद्धी, प्राची यांनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. कृष्णात ठोंबरे, चेतना शाळेचे विद्यार्थी महेश तात्या सावंत, सयाजी साळोखे, प्रशांत कुइंगडे, ओंकार गोडसे, शिवभक्त उपस्थित होते. अथर्व जाधव यांनी सर्वांना दूध वाटप केले.
--------

07583
स्वराज्याची वाटचाल सुकरतेसाठीच राज्याभिषेक
डॉ. रमेश जाधव; समाजशास्त्र, विद्यार्थी विकास आणि नेहरू अभ्यास केंद्रातर्फे व्याख्यान
कोल्हापूर : ‘‘छत्रपती शिवरायांनी कोणत्याही स्वार्थापायी नव्हे, तर कायदेशीर राजेपणाची मोहोर उमटवून स्वराज्याची वाटचाल अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने राज्याभिषेक करवून घेतला. सन १५६५ मध्ये तालीकोटच्या लढाईमुळे विजयनगरचे साम्राज्य लयास गेल्यानंतर शतकभरानंतर पुन्हा एतद्देशीय राज्याची प्रस्थापना जाहीर करणारा ऐतिहासिक क्षण होता,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा समाजशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि नेहरू अभ्यास केंद्रातर्फे शिवस्वराज्य दिनानिमित्त डॉ. विलास संगवे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. डॉ. जाधव यांनी ‘परप्रांतीयांच्या नजरेतून शिवराज्याभिषेक’ यावर प्रकाशझोत टाकला.
डॉ. जाधव म्हणाले, ‘‘शिवरायांनी राज्याभिषेक करवून घेणे ही विजयनगरच्या ऱ्हासानंतर या देशात घडलेली एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तत्कालीन संघर्ष हा दोन धर्मांमधील नव्हता, तर ऐतद्देशीय आणि परकीय यांच्यामधील तो सत्तासंघर्ष होता. शिवरायांना राज्याभिषेकाच्या बरोबरीने छत्र, सिंहासन, पोशाख हे तर अभिप्रेत होतेच, पण आपल्या कायदेशीर राजेपणाची मोहोर जनमानसावर सर्वदूर उमटविणे महत्त्वाचे वाटत होते. मोहिते-निंबाळकरांसारख्यांनी महाराजांना सातत्याने त्यांच्या राजेपणाविषयी हिणविले. अशा मंडळींना शिवरायांनी ‘आता मी राजा आहे,’ असा कडक संदेश राज्याभिषेकाच्या माध्यमातून द्यावयाचा होता. त्याखेरीज स्थानिकांना त्यांची हिंदवी जीवनपद्धती महाराजांनी पुन्हा प्राप्त करून दिली. सर्वधर्मसमभावाची हमी देतानाच आपल्या रयतेला परकीय आक्रमकांपासून पूर्ण संरक्षण देऊन निर्धास्त राहणीमानाची शाश्वती प्रदान केली. स्वतःचे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करीत असताना राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या स्वराज्याला मान्यता प्राप्त करवून घेण्याचा महाराजांचा इरादा या राज्याभिषेकाने साध्य झाला. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची दखल घेतल्यामुळेच इंग्रजीसह हिंदी, फारसी, डच, जर्मन, पोर्तुगीज आदी भाषांमध्ये त्यांच्याविषयीची विपुल साधने निर्माण झाली.
पश्चिम बंगालचे जदुनाथ सरकार यांनी १२ वर्षे अथक संशोधन करून औरंगजेबाचे पाच खंडी चरित्र साकारले. औरंगजेबावरील संशोधन करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे ते आकृष्ट झाले. औरंगजेबाच्या कट्टरतेला हिंदवी स्वराज्य स्थापन करून कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या महाराजांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले.’’
समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत केले. नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी परिचय करून दिला. आकाश ब्राह्मणे, सद्दाम मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले. डॉ. एस. एन. पवार, डॉ. जगन कराडे, डॉ. आर. बी. पाटील, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, डॉ. अर्चना जगतकर, डॉ. अविनाश भाले, समाजशास्त्राचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.


07700
शिवाजी तरुण मंडळ
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी तरुण मंडळातर्फे उभा मारुती चौकामध्ये शिवराज्याभिषेक फलकाचे पूजन अॅड. रमेश पवार, अॅड. राजेंद्र किंकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण, शिवाजी जाधव, अजित खराडे, प्रसाद चव्हाण, श्रीकांत भोसले, चंद्रकांत साळोखे, चंद्रकांत यादव, केशवराव जाधव, शिवाजी तरुण मंडळाचे व्यवस्थापक शरद नागवेकर, अमोल कुरणे, संजय कुराडे, सुहास साळुंखे, अतुल भालकर, रोहित मोरे, विनय शिंदे, ज्योतीराम जाधव आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com