ताळेबंदातून कामगारांची देणी वगळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताळेबंदातून कामगारांची देणी वगळली
ताळेबंदातून कामगारांची देणी वगळली

ताळेबंदातून कामगारांची देणी वगळली

sakal_logo
By

ताळेबंदातून कामगारांची देणी वगळली
गोडसाखर निवृत्त कामगार; मोर्चाने पोलिसांकडे दिली तक्रार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना (गोडसाखर) उणे नेटवर्थमध्ये असताना गतवर्षीच्या ताळेबंदात फेरबदल करुन तो प्लसमध्ये आणला आहे. हे करत असताना या ताळेबंदातून निवृत्त कामगारांची देणी वगळली आहेत. कामगार व सभासदांची ही फसवणूक असून पोलिसांनी अध्यक्षांसह कार्यकारी संचालक, मुख्य लेखापाल, फायनान्स मॅनेजर यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी गोडसाखर निवृत्त कामगार संघटनेने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयापासून पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चाने जावून ही तक्रार पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांच्याकडे दिली. २०२१-२२ च्या ताळेबंदात कारखान्याचे नक्त मूल्य (नेटवर्थ) उणे ४१ कोटी ५४ लाखाचा असल्याचा उल्लेख आहे. दरम्यान कारखान्याने केडीसी बँकेकडे कर्ज मागणी प्रस्तावासोबत २०२२-२३ वर्षाचा ताळेबंद जोडला आहे. विशेष लेखापरीक्षकांकडून माहितीच्या अधिकाराखाली हा ताळेबंद व आर्थिक पत्रके मागवली. कारखान्याचा उणे नेटवर्थ असताना नव्या ताळेबंदात तो प्लसमध्ये दाखवल्याचे स्पष्ट होते. काही देय रक्कमाही बेकायदेशीर दाखवल्या आहेत.
तसेच, निवृत्त कामगारांच्या विविध थकीत रक्कमाही वगळल्याने अन्याय झाला आहे. याची सखोल चौकशी होवून कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी खोत यांनी केली. याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेवून पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही श्री. सरगर यांनी खोत व शिष्टमंडळाला दिली. चंद्रकांत बंदी, श्रीकांत रेंदाळे, रामा पालकर, महादेव मांगले, अरुण लोंढे, सुरेश पाटील, संजय सोनी, सुरेश पोवार, आप्पाजी काळे, गोरखनाथ चव्हाण, सदाशिव कांबळे आदी उपस्थित होते.
------------
हजारो शेतकरी आणि कामगारांच्या जीवनाशी निगडीत असलेला कारखाना सुरू करण्यासाठी धडपड चालली आहे. कारखाना मोडीत काढायचा की तो सुरू ठेवायचा, याचा विचार आता सभासद व शेतकऱ्यांनीच करावा. कारखाना उर्जितावस्थेत आल्यानंतर सर्व निवृत्त कामगारांची पै अन पै देणी देणार आहे. वीस वर्षापासून कारखाना अडचणीत येत असताना एक साधी प्रतिक्रिया न देणारे लोक आता मात्र बोलत आहेत. परंतु आमचे ध्येय कारखाना सुरू करणे हेच आहे."
-डॉ. प्रकाश शहापूरकर, अध्यक्ष, गोडसाखर