
चक्रीवादळाचे सावट गडद
चक्रीवादळाचे सावट गडद
आजपासून पाऊस शक्य; मॉन्सून मात्र लांबला
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ६ ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज दिला आहे; मात्र मॉन्सूनची चाल मंदावल्यामुळे केरळातील आगमन आणखी लांबणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मॉन्सूनचा मुहूर्त देखील टळणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कोकण आणि मुंबई, ठाणे जिल्ह्यांवर होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे एक प्रकारची धास्ती जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आहे. उद्या पहाटेपर्यंत चक्रीवादळासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, जूनचा पहिला आठवडा पूर्णतः कोरडा गेला असून हवामान विभागाने ७ ते ११ जून या कालावधीत पावसाचा अंदाज दिला आहे. जिल्ह्यात पावसाची शक्यता असली तरी मॉन्सूनची प्रतीक्षा कायम राहणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रात प्रगती करीत दोन जूनला लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंका, संपूर्ण कोमोरीनचा भाग आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागांत प्रगती केली होती. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल पूर्णतः मंदावली आहे. पोषक स्थिती नसल्याने मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले आहे. हवामान खात्याने मॉन्सून ४ जूनला केरळात, तर १० जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज दिला होता; परंतु केरळमधील मॉन्सूनचे आगमन लांबणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील मान्सूनचे आगमन देखील लांबणार आहे.
कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यास जिल्ह्याच्या किनारपट्टीसह विविध भागांत त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळाच्या शक्यतेने लोकांच्या मनात धास्तीचे वातावरण आहे.
.................