
शिवराज्याभिषेक मिरवणूक
07701, 07702, 07703
पारंपरिक थाटात मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कार्याला वंदन करण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा मिरवणूक काढली. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शिव कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या संदेशाचे फलक, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला रथ, पारंपरिक वेशभूषेत वारकरी भजनी मंडळे अशा पारंपरिक थाटात निघालेल्या मिरवणुकीने शक्ती-भक्तीचा संगम साधला.
मराठा स्वराज्य भवन, मराठा महासंघातर्फे मंगळवार पेठेतील मराठा भवनवरून निघालेल्या मिरवणुकीचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार जयश्री जाधव, उद्योजक व्ही. बी. पाटील, संयोजक वसंत मुळीक, बबन रानगे, डॉ. संदीप पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली.
३४९ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून ही मिरवणूक काढण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हिताचे संदेश दिले, तसेच विविध उपक्रमांतून विविध समाजघटकांना एकसंध ठेवून रयतेला स्वाभिमान व आत्मविश्वास दिला. त्याबरोबर जगण्याचे बळ दिले. त्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या संदेशाचे फलक असलेल्या रिक्षा मिरवणुकीत अग्रभागी होत्या.
या पाठोपाठ भगवी वेशभूषा केलेल्या महिला-युवतींचे लेझीम पथक, टाळ धनगरी ढोलपथक, हलगी घुमके, तुतारीचा निनादाने शौर्याची ऊर्जा दिली. पांढऱ्या वेशभूषेतील वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालसुरात गायलेली भक्तिगीते, भजनी गीतांनी मिरवणुकीला सूर-ताल दिला. याबरोबरच शिवराज्याभिषेकाची डॉ. अल्पना चौगुले यांनी रेखाटलेली चित्रकृती आदी पथकांनी मिरवणुकीचा थाट वाढविला, तसेच शिवकर्तृत्वाला उजाळाही दिला.
मिरवणूक मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे छत्रपती शिवाजी चौकात आली. वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीवर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव झाला; तर मिरवणूक मार्गावर फुलांची रांगोळी घालण्यात आली.
मराठा महासंघ तसेच विविध तालीम संस्थांचे पदाधिकारी यांच्या सहयोगाने गेली १७ वर्षे शिवराज्याभिषेक दिन सोहळा मिरवणूक काढण्यात येते. यात यंदाही या मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी झाले. विविध जाती-धर्माच्या संस्था, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले. समतेचा विचार कृतीत आणण्याचा उपक्रम यंदाही जोपासला गेला.
--------------
चौकट
स्वच्छ सुंदर कोल्हापूरसाठी संकल्प करूया
कोल्हापूराचा पारा ४० वर गेला. पंचगंगा, जयंती व गोमती नद्या प्रदूषित झाल्या. रंकाळा तलावात दूषित पाणी मिसळून पाण्याला दुर्गंधी येते, हे चित्र बदलण्यासाठी संकल्प करू शकतो. घर तेथे एक वृक्षारोपण, नद्या-नाल्यांत निर्माल्य न टाकणे, रक्षाविसर्जन नदीत न करणे, मैलामिश्रीत पाणी रंकाळ्यात जाणार नाही, याची काळजी घेऊन परिसर सुशोभीत ठेवूया. आपलं शहर सुंदर ठेवूया, असे संदेश देणारे फलक लक्षवेधी ठरले.