
विविध मागण्यासाठी माकपची निदर्शने
07822
इचलकरंजी : विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.
विविध मागण्यांसाठी
‘माकप’ची निदर्शने
इचलकरंजी, ता. ७ : शासनाने संजय गांधी, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, अपंग पेन्शन योजनेमध्ये ५०० रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ व केंद्र सरकारच्या फरकाची रक्कम तत्काळ देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निदर्शने केली. याबाबतचे निवेदन पुरवठा अधिकारी सुरेखा पोळ यांना देण्यात आले. यावेळी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाने फेब्रुवारी २०२३ च्या बजेटमध्ये ५०० रुपयांची वाढ जाहीर केलेली आहे. ही वाढ तुटपुंजी आहे. संघटनेतर्फे तीन हजार रुपये वाढ मिळावी यासाठी संजय गांधी कार्यालयावर आंदोलने करून निवेदने दिली होती; मात्र राज्य सरकारने ५०० रुपयांची वाढ घोषित केली. या घोषणेला चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे; पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे अनुदान पंधरा दिवसांत देण्याची तरतूद असताना तेही मिळालेले नाही. लाभार्थ्यांचे प्रकरण मंजूर होऊनसुद्धा पेन्शन मिळालेली नाही. या सर्व गोष्टींची तत्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा संजय गांधी कार्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल. यावेळी भरमा कांबळे, सदा मलाबादे, धनाजी जाधव, दादू कांबळे, सैफनबी शेख, शोभा झळके, अर्जुन कांबळे, कल्पना माळगे उपस्थित होते.