अकबर मोहल्ल्यातील वातावरण

अकबर मोहल्ल्यातील वातावरण

07852

कोल्हापूर : अकबर मोहल्ल्यातील एका गल्लीत विटा, दगड, बाटल्यांचा पडलेला खच.

07915

भाऊसिंगजी रोडवरील अकबर मोहल्ल्यासमोर फोडलेली अश्रुधुराची नळकांडी.
...

अकबर मोहल्ल्यात पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

दोन्हीकडून तुफान दगडफेक ः दगड, विटांसह बाटल्यांचा खच

कोल्हापूर, ता. ७ ः भाऊसिंगजी रोडवरील अकबर मोहल्ला परिसरात दोन गट आमने-सामने आले. या दोन्ही गटांनी केलेल्या तुफान दगडफेकीमुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. दगड, विटांसह काचेच्या बाटल्या एकमेकांच्या अंगावर भिरकावण्यात आल्या. यामुळे या परिसरातील रस्त्यावर दगड, विटांसह काचांचा खच पडला होता. त्याचवेळी या परिसरातील रस्त्यावर लावण्यात आलेल्या रिक्षा उलटवून टाकण्यात आल्या. हिंसक बनलेल्या या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या सहा नळकांड्या जमावाच्या दिशेने फोडल्यानंतर जमाव रस्ता मिळेल त्यादिशेने गायब झाला.
अकबर मोहल्ला म्हणजे, दाटीवाटीचा परिसर. दोनच गल्ल्या त्याही अरूंद. एखादा टेम्पो, रिक्षा आत जाणेसुद्धा अशक्य. दुपारी पावणेबारा ते सव्वा बाराची वेळ. मराठा बँक म्हणजे, आताची सारस्वत बँक या ठिकाणी तर तिकडे टाऊन हॉलच्या बाजूने अन्‌ शनिवार पोस्ट कार्यालयाच्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेडस्‌ लावून रस्ता बंद केला होता. अकबर मोहल्ला परिसर मुस्लिमबहुल असल्याने त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची दक्षता घेत पोलिसांनी बॅरिकेडस्‌ लावले होते.
दुपारी साडेबाराच्या सुमारास शनिवार पेठ पोस्टाच्या दिशेने एक गट रस्त्यावर आला, त्याचवेळी अकबर मोहल्ल्यातील काही तरुण रस्त्यावर आले. क्षणाचाही विलंब न लावता या दोन्ही गटांनी एकमेकांवर प्रचंड दगडफेक सुरू केली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे ही धुमश्‍चक्री सुरू होती. अचानक घडलेल्या या प्रकाराने लोक रस्ता दिसेल त्या दिशेला पळू लागले. अनेकांनी मोठ्या इमारती, पान टपरी, वाहनांत आडोसा घेत स्वतःचा बचाव केला. या धुमश्‍चक्रीत बाटल्या, विटा, दगड आणि काठ्यांचाही वापर झाला. त्यामुळे या परिसरात दगड-विटांसह काचांचा मोठा खच पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरात दाखल झाला. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी हिंसक जमावाच्या दिशेने सोडल्यानंतर जमाव पांगला.
घटनेचे गांभीर्य ओळखून विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन परिस्थितीची माहिती घेत पोलिसांना यावर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले. बराच वेळ हे अधिकारी या परिसरात थांबून होते.
...........
चौकट

्ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता रिकामा

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय चौकातून एक ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत अकबर मोहल्ला या ठिकाणी येताच दोन्ही बाजूच्या तरुणांनी ॲम्ब्युलन्सचा रस्ता रिकामा करून दिला. या ॲम्ब्युलन्समध्ये लहान मुलगा असल्याने ॲम्ब्युलन्सच्या खिडकीतून डोके बाहेर काढून एक नातेवाईक रस्ता देण्यासाठी कळकळीची विनंती करत होता. ॲम्बुलन्समधील त्या नातेवाईकांची विनंती ऐकल्यानंतर रस्ता रिकामा करून ॲम्ब्युलन्स पुढे सरकली.
...

भेदरलेल्या महिला

दगड, विटा जशा रस्त्यावर येऊन पडू लागल्या, त्या भीतीने अनेक महिला घराच्या बाहेरही पडल्या नाहीत. कुटुंबातील अन्य सदस्यांना कळकळीची विनंती करत घराबाहेर जाऊ नका, असे महिलांनी समजावले. स्वत: महिलाच भेदरलेल्या अवस्थेत होत्या. अशातच अश्रुधुरांच्या नळकांडी फोडल्यानंतर झालेल्या आवाजाने तर अनेकांची दातखिळ बसली. हा आवाज एखाद्या बॉम्बस्फोटाच्या आवाजासारखा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com