‘कृषी’तील रोजगार संधी साधण्यासाठी कौशल्य विकास करा

‘कृषी’तील रोजगार संधी साधण्यासाठी कौशल्य विकास करा

28447

‘कृषी’तील संधी साधण्यासाठी
कौशल्य विकास करा : बिरारी
शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : शेती क्षेत्रात पदवीधरांना उद्योजक होण्यासह रोजगाराच्या अफाट संधी आहेत. ग्रामीण भागात शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग व त्यातून अनेकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे शक्य आहे. तरूणांनी याचा गांभीर्याने विचार करावा. कृषी व्यवसाय संबंधित माहिती घेऊन त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये स्वतःमध्ये विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’-‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’चे कृषी विभागप्रमुख अमोल बिरारी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग, समाजशास्त्र अधिविभाग आणि ‘एसआयआयएलसी’तर्फे पदवीधरांसाठी ‘कृषी व्यवसाय व अन्न प्रक्रिया उद्योग संधी’ याविषयावर विद्यापीठात कार्यशाळा झाली. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते. अन्न प्रक्रिया उद्योजिका गंधाली दिंडे, मसाला प्रक्रिया उद्योजक तुषार राऊत, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार, बेटी बचाव अभियान समन्वयक डॉ. पी. बी. देसाई, वरिष्ठ व्यवस्थापक अमित मांजरे उपस्थित होते.
उद्योजिका दिंडे म्हणाल्या, ‘‘देशात अन्न प्रक्रिया उद्योगाची वेगाने वाढ होत आहे. सरकारही अन्न प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे. अन्न प्रक्रिया उद्योग छोट्या स्तरावर सुरू करून त्यात मोठी उलाढाल करणे शक्य आहे. यासाठी तरुणांनी व्यवसायाची माहिती घेऊन. शासनाच्या मदतीद्वारे स्टार्ट-अप सुरू करण्यास संधी आहे.’’
या कार्यशाळेत डॉ. प्रकाश राऊत यांनी विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरची माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांना नव उद्योजक व्हायचे आहे त्यांच्यासाठी सेंटरतर्फे सीड फंडिंग उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विद्यापीठातील तसेच संलग्न महाविद्यालये, कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह स्वप्निल साखरे, कार्यक्रम समन्वयक स्वप्निल मानगावे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.
-----------------
व्यवसाय सुरू करण्यासाठी जिद्द ठेवा
कोल्हापुरातील ‘तुषार मसाले’चे संस्थापक तुषार राऊत यांनी त्यांच्या उद्योगाच्या वाटचालीची यशोगाथा सांगितली.‌ ते म्हणाले, कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी जिद्द ठेवावी. आपले उत्पादन चांगले आहे ते अधिकाधिक लोकांना पटवून द्यावे.
-------------
झोकून देवून काम करा
विद्यार्थ्यांनी कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी झोकून देऊन काम करण्याची तयारी, जिद्द, चिकाटी तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठ विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी नेहमीच तत्पर असून विविध प्रशिक्षण देण्यावर भर दिला असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com