
‘एक तास श्रमदाना’त हजारो हातांची साथ
34988
गडहिंग्लज : पालिकेने केलेल्या आवाहनानुसार एक तास श्रमदानासाठी नागरिकांनी ओपन स्पेसच्या स्वच्छतेसाठी सहभाग नोंदवला.
‘एक तास श्रमदाना’त हजारो हातांची साथ
गडहिंग्लज शहर : १८ ठिकाणाहून सहा टन कचऱ्याचे संकलन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार पालिकेच्या पुढाकाराने आज दहा वाजता एक तास श्रमदानाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातंर्गत शहरातील नियोजित केलेल्या १८ ठिकाणच्या स्वच्छतेसाठी दोन हजारहून अधिक नागरिक धावून आले. या मोहिमेतून सहा टन कचऱ्याचे संकलन करुन कंपोष्ट डेपोमध्ये नेण्यात आला.
पालिकेने कोणत्याही उपक्रमात लोकसहभागाची हाक दिली आणि तो मिळाला मिळाला नाही असे कधीच झाले नाही. आजच्या स्वच्छता उपक्रमातही सहभागाचे पालिकेने केलेल्या आवाहनानुसार हजारो नागरिकांचे हात या श्रमदानात गुंतले. नऊ प्रभागात १८ ठिकाणी स्वच्छतेसाठीच्या जागा निश्चित केल्या होत्या. सकाळी दहा वाजता त्या-त्या भागातील नागरिकांनी दहा वाजता एकत्र येवून स्वच्छतेला प्रारंभ केला. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या मार्गदर्शनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे नियोजन केले.
या उपक्रमातून काळभैरी रोड, गवळीवाडा, कंपोस्ट डेपोसमोरील रस्ता, पाटणे, घुगरे गल्ली, भीमनगर, म. दुं. श्रेष्ठी विद्यालय, नदीवेस परिसर, सुपर मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदिर, साधना कॉलनी, नवीन कोर्ट इमारत परिसर, पोलिस लाईन, गांधीनगर ओपन स्पेस, बी. बी. पाटील कॉलनी, बॅ नाथ पै विद्यालय, देवगोंडा कॉलनी, घाळी कॉलनी, संकल्पनगर, भडगाव रोड या भागातील स्वच्छतेसाठी दोन हजारहून अधिक नागरिकांनी श्रमदान केले. पालिकेने स्वच्छतेसाठी हातमोजे, कचरा उठावसाठी घंटागाडी, ट्रॅक्टरची सुविधा पुरवली होती. या ठिकाणाहून सर्व प्रकारचा असा सहा टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या मोहिमेत नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह राष्ट्रवादी, जनता दल, भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिवराज, डॉ. घाळी, साधना, ओंकार महाविद्यालयातील एनसीसी, एमसीसीचे स्वयंसेवक, विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था सहभागी झाले होते.
---------------
चौकट...
ज्ञानदीप प्रबोधिनीचा सहभाग
पालिकेने आयोजित केलेल्या या अभियानात रवळनाथ हौसिंग फायनान्स व ज्ञानदीप प्रबोधिनीने सहभाग दर्शविला. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते मोहिम सुरु झाली. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर्स कॉलनीत प्रबोधन फेरी काढली. श्री. खारगे यांनी संस्थेचे व पालिका कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. संस्थेचे संचालक, सीईओ डी. के. मायदेव, शिवानंद घुगरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, झेप व इंटेट करिअर अकॅडमीचे शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी स्वच्छतेत सहभागी झाले.