काँग्रेस नाराज आमदार
नगरसेवकांची नाराजी मान्य; आमदारांच्या नाराजीचे काय?
.........
काँग्रेसमध्ये थेट नेत्यांनाच आव्हान ः पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गृहित धरणे धोकादायक
.........
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : माजी नगरसेवकांनी विरोध केला आणि कोल्हापूर उत्तरची उमेदवारीच बदलली, दुसरा उमेदवार जाहीर करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप करत थेट विद्ममान आमदार जयश्री जाधव यांनीच अन्य पक्षाचा पर्याय स्विकारला. विधानसभेच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये थेट नेत्यांनाच आव्हान देणाऱ्या या घटना पक्षासाठी जड जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना ती देण्यात आली. या निर्णयावरही नाराज होवून काँग्रेसच्या याच मतदार संघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्या. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व ठेवलेल्या काँग्रेससमोर अशा मोठ्या घटनांचे मोठे आव्हान असेल.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमदेवारी देण्याचा पॅर्टन राबवणार असल्याची काँग्रेसची आणि आमदार सतेज पाटील यांची भूमिका होती. यामध्ये आमदार सतेज पाटील यांना यशही आले. इच्छुक म्हणून ज्या-ज्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्या सर्वांनी ज्याला पक्ष उमेदवारी देईल, त्याच्यासोबत कायम राहणार असा शब्द दिला होता. प्रत्यक्षात उमदेवारी मिळालली नाही म्हणून काँग्रेस कमिटी कार्यालयाची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या सचिन चव्हाण यांच्याच कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर दगडफेक करुन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आमदार जयश्री जाधव यांच्या व्यतिरिक्त शारंगधर देशमुख, अर्जुन माने, आनंद माने यांच्यासह माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत मधुरिमाराजे छत्रपती यांना उमदेवारी देण्याची एकमुखी मागणी केली. काँग्रेसनेही कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार २४ तासात उमेदवार बदलला आणि मुधरिमाराजे छत्रपती यांना उमदेवारी दिली.
दरम्यान, उमदेवारी मिळाल्यानंतर राजेश लाटकर हे आमदार जयश्री जाधव यांना भेटण्यासाठी घरी गेले होते. त्यावेळी आमदार जाधव यांनी लाटकर यांच्या गळ्यात काँग्रेसचा मफलर घालत शुभेच्छा देवून त्यांना पाठिंबा दिला होता. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या तिन्ही उमदेवारांचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी, उमदेवारी अर्ज भरण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्याकडून त्यांना निमंत्रणही दिले. मात्र, उमेदवारी मिळालेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांच्याकडून विद्यमान आमदार जाधव यांना कोणताही निरोप दिला नाही. त्यामुळे आमदार जाधव शक्ति प्रदर्शनाला अनुपस्थित राहिल्या. त्याचवेळी श्रीमती जाधव या अन्य पर्यायांचा विचार करत असल्याची चर्चा होती, त्याप्रमाणे त्यांनी आज निर्णय घेतला.
कोल्हापूर उत्तरमधून काटाजोड लढत होणार आहे. अशावेळेला एक-एक कार्यकर्ता महत्वाचा असताना विद्यमान आमदारच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आणि ज्यांना विविध मतदार संघात उमदेवारी मिळाली आहे, त्या प्रत्येक उमदेवाराने काँग्रेस कार्यकर्त्यांना गृहित धरण्याऐवजी विश्वासात घेणे महत्वाचे आहे, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत.
.......
चौकट
आण्णांच्या माघारी, आमची जबाबदारी?
कै. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ‘आण्णांच्या माघारी, आमची जबाबदारी’ म्हणून आमदार सतेज पाटील यांनी उत्तरमधील पोटनिवडणूकीत श्रीमती जाधव यांच्यासाठी चांगली यंत्रणा राबवली. मात्र, आमदार जाधव या शिंदे गटात जाताना आमदार पाटील यांनाही कळवले नसल्याची खंत आहेच, पण सर्व घडामोडीचा पक्षाच्या यशावर परिणाम होणार यासाठी नेत्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

