काँग्रेस नाराज आमदार

काँग्रेस नाराज आमदार

Published on

जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये
थेट नेत्यांनाच आव्हान

नगरसेवकांची नाराजी मान्य; आमदारांच्या नाराजीचे काय? ः पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गृहित धरणे धोकादायक

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : माजी नगरसेवकांनी विरोध केला आणि कोल्हापूर उत्तरची उमेदवारीच बदलली. दुसरा उमेदवार जाहीर करताना विश्‍वासात न घेतल्याचा आरोप करत थेट विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनीच अन्य पक्षाचा पर्याय स्वीकारला. विधानसभेच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये थेट नेत्यांनाच आव्हान देणाऱ्या या घटना पक्षासाठी जड जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना ती देण्यात आली. या निर्णयावरही नाराज होऊन काँग्रेसच्या याच मतदारसंघाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्या. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व ठेवलेल्या काँग्रेससमोर अशा मोठ्या घटनांचे मोठे आव्हान असेल.
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. दस्तूरखुद्द आमदार सतेज पाटील हेही पराभूत झाले होते; पण २०१९ च्या निवडणुकीत पक्षाचे चार आमदार विजयी झाले. या चारही आमदारांच्या विजयात पाटील यांचा मोठा वाटा होता; पण यावेळी त्यांच्यासमोरच एक एक घटना म्हणजे आव्हानांचा डोंगर उभा राहत आहे. परिणामी निवडणूक प्रचार, त्याचे नियोजन राहिले बाजूला, अशा घडामोडी सावरतानाच त्यांची दमछाक होणार आहे.
यावेळी पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातच झालेल्या बंडखोरीमुळे आहे त्या चार जागा राखतानाच पक्ष नेतृत्वाची दमछाक होणार आहे. तोपर्यंत कोल्हापूर उत्तरच्या या निर्णयाने पक्षाला किंबहुना नेतृत्वालाही मोठा धक्का बसला आहे. त्याचे चांगले, वाईट परिणाम काय याचा निर्णय २३ नोव्हेंबरला होईल; पण तोपर्यंत या प्रकरणांची सारवासारव करण्याबरोबरच विरोधकांच्या टीकेला उत्तर देतानाही आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे व त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.
पहिल्यांदा ज्या लाटकर यांना उमेदवारी दिली, त्यांनी अर्ज दाखल करून लढणारच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांची समजूत कशी काढायची, त्यासाठी कोणाला मध्यस्थी घालायचे, याचे नियोजन सुरू असतानाच थेट विद्यमान आमदारच विरोधकांच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत. लाटकर यांनी पोटनिवडणुकीत असो किंवा अलीकडेच झालेल्या लोकसभेत काँग्रेस उमेदवारांसाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वजण कौतुक करत होते. आज तेच लाटकर मुख्य भूमिकेत आहेत. ते रिंगणात राहिले तर त्याचे परिणाम काय असतील याविषयी उत्सुकता आहे.
काँग्रेसची उमेदवारी बदलली आणि दुसऱ्याच दिवशी झालेल्या पक्षाच्या शक्तिप्रदर्शनाकडे श्रीमती जाधव यांनी पाठ फिरवली. वास्तविक त्याचवेळी नेत्यांनी या घडामोडीकडे गांभीर्याने बघायला हवे होते. श्रीमती जाधव यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याची गरज होती; पण तसे काहीच झाले नाही. त्या कुठे जाणार, काय करणार? या भ्रमात नेते आणि प्रमुख पदाधिकारी राहिले.

चौकट
निकालावरील परिणामाची उत्सुकता
जाधव यांच्या पोटनिवडणुकीत छत्रपती घराण्यांतील व्यक्तींसह आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले होते; पण त्यांनाही जाधव यांना विचारावे असे वाटले नाही. याचीही खंत नेते व पदाधिकाऱ्यांना आहेच; पण त्यापेक्षा उमेदवार ठरवताना किंवा बदलताना आपल्याला का विचारले नाही, हा श्रीमती जाधव यांचा आरोपही नेते खोडून काढू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत या घडामोडीचा ‘उत्तर’च्या निकालावर काय परिणाम होणार याची उत्सुकता आहे. त्यासाठी २३ नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com