दिवाळी

दिवाळी

Published on

उत्सव प्रकाशाचा...
कोल्हापूर ः दिवाळी म्हणजे तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा, श्रमगंगेला प्रसन्न करत राब राब राबणाऱ्या बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाही सण. साहजिकच ग्रामीण भागातील या प्रकाशोत्सवाचा बाजही वेगळाच. वरणगे पाडळी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील विलास हरी गायकवाड आणि परिवाराचा गुरुवारी रात्री सजलेला हा आनंदसोहळा.
(छायाचित्र ः बी. डी. चेचर, सहकार्य ः सचिन कामत, शुभम चेचर)
...............

चैतन्यसोहळा सजला

बाजारपेठ हाउसफुल्ल, आज लक्ष्मीपूजन, उद्या दिवाळी पाडवा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः ‘संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे...’ अशा शुभेच्छा देत दीपोत्सवाचा चैतन्य सोहळा आता सर्वत्र सजला आहे. आबालवृद्धांचा आनंद टिपेला पोहचला असून, उद्या (शुक्रवारी) सर्वत्र लक्ष्मीपूजन साजरे होणार आहे.
दरम्यान, बाजारपेठेत आजही दिवसभर हाऊसफुल्ल गर्दी राहिली. काल रात्री अचानक पावसानं हजेरी लावल्यानं बाजारपेठेत धांदल उडाली. मात्र, आज सकाळपासून पुन्हा उत्साहाला उधाण आलं. अखेरच्या दिवशी अनेक शोरूम्सनी ऑफर्सचा अक्षरशः खजिना खुला केला. घरोघरी आकाशदिवे, पणत्या आणि फराळाच्या सुगंधानं मांगल्याचं वातावरण आहे. नव्या कपड्यांतलं नटलेलं रुपडं, अंगणात सडा टाकून सजलेली रांगोळी, तिच्या शेजारी पणत्यांची आरास आणि या साऱ्या माहोलावर प्रकाशझोत टाकणारे विविधरंगी आकाशकंदील... असा पारंपरिक बाज या सोहळ्याला लाभला आहे. पै-पाहुण्यांना फराळाचे डबे देण्याची परंपरा यंदाही कोल्हापूरकरांनी आत्मीयतेनं जपली आहे. विविध सेवाभावी संस्था आणि संघटनांतर्फे सामाजिक बांधिलकी जपत जाणीवांची दिवाळी साजरी करत आहेत.

बाळा, गरिबाला देऊन टाक
बाजारपेठेत काल रात्री झालेल्या पावसामुळे विक्रेते व फेरीवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही विक्रेत्यांकडील वस्तू पावसाने भिजल्या. त्या पुन्हा नीट करण्याची सकाळपासूनच त्यांची लगबग सुरू झाली. अशा वस्तू नीट ठेवतानाच सोबत असलेल्या आपल्या पोराला, नातवांना ही विक्रेते मंडळी ‘बाळा हे एखाद्या गरिबाला देईल तेवढ्या पैशात देऊन टाक’ असं आवर्जून सांगत होती. झालेलं नुकसान विसरून जाणीवांची अशी अनोखी दिवाळी सकाळी बाजारपेठेत अनुभवायला मिळाली.

चला, किल्ले पाहायला...
बालमित्रांनी साकारलेल्या किल्ले पाहण्यासाठीही रात्री गर्दी होऊ लागली आहे. सायंकाळनंतर किल्ल्यांच्या या भव्य प्रतिकृती विद्युतरोषणाईनं उजळून निघाल्या आहेत. किल्ल्यांची सचित्र माहितीचे दालनही काही मंडळांनी प्रतिकृतीशेजारी उभारलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास यानिमित्तानं नव्या पिढीसमोर उलगडत आहे.

चौकट
दृष्टिक्षेपात दीपोत्सव...
० शुक्रवार (ता. १) ः लक्ष्मीपूजन (मुहूर्त सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत)
० शनिवार (ता. २) ः दिवाळी पाडवा, बलीप्रतिपदा
० रविवार (ता. ३) ः भाऊबीज
० १३ नोव्हेंबर ः तुळशी विवाहारंभ
० १५ नोव्हेंबर ः त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिकस्वामी दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com