जयश्री जाधव प्रेस

जयश्री जाधव प्रेस

Published on

उमेदवारी बदलताना पक्षाने विश्‍वासात घेतले नाही
जयश्री जाधव : थांबायला का सांगितले, याचे उत्तर शेवटपर्यंत मिळाले नाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : मी विद्यमान आमदार असतानाही कोल्हापूर उत्तरची उमेदवारी बदलताना मला विश्‍वासात घेतले नाही. आदल्या दिवशी रात्री उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या असा निरोप आला. मलाही कमी कलावधी मिळाला होता. मीही इच्छुक होते. मात्र, आमदार सतेज पाटील यांनी थांबण्यासाठी सांगितले. मात्र, थांबण्यासाठी का सांगितले याचे उत्तर मिळाले नाही, त्यामुळे आज मी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आमदार जयश्री जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेस माजी खासदार संजय मंडलिक, सत्‍यजित जाधव उपस्थित होते. यावेळी मंडलिक यांनी कोल्हापूर उत्तरसह जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी जाधव यांच्यावर असेल. त्यांना महिला सबलीकरणासाठी पक्षाने उपनेत्या हे पद दिले आहे. त्यांचे सामाजिक काम भविष्यातही सुरू ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव मदत देण्याचेही आश्‍वासन देण्यात आल्याचे सांगितले.

आमदार जाधव म्हणाल्या, ‘पोटनिवडणुकीत माझा भाऊ म्हणून आमदार सतेज पाटील आणि राजघराणे माझ्या पाठीशी राहिले. मी त्यांचे ऋणी आहे. अण्णांचा (चंद्रकांत पाटील) कालावधी कोविडमध्ये गेला. त्यानंतर केवळ दोनच वर्षे मला मिळाली होती. त्यामुळे मी महिन्या-दीड महिन्यांपूर्वीच पुन्हा इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. मात्र, त्यांनी तुम्हाला थांबावे लागेल, असे सांगितले. का थांबावे लागेल, याचे उत्तर आजपर्यंत दिलेले नाही. कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तेव्हाही मी मुलाखत दिली. तेथे कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार असल्यामुळे मी माघार घेतली. राजेश लाटकरांचे नाव निश्‍चित झाल्यावरही आम्ही स्वागत केले. ते घरी येऊन भेटून गेले. मात्र, त्यानंतर उमेदवारी बदलण्याच्या प्रक्रियेत मला सहभागी केले नाही. मी विद्यमान आमदार असताना मला डावलले. थेट उमेदवारी अर्ज भरण्याठी बोलावले. त्यामुळे आम्ही अर्ज भरण्यासाठी गेलो नाही. त्यानंतर आम्ही नाराज होतो. पुढे काय कारायचे हा विचार सुरू होता. तोपर्यंत ही संधी आली आणि आम्ही निर्णय घेतला.

चौकट
..तर समाजकरणाला पूर्णविराम मिळाला असता
ज्या मधुरिमाराजे यांनी तुम्ही विजयी होण्यासाठी प्रचार केला. त्यांच्या विरोधात प्रचार करणार काय? या प्रश्‍नावर महायुतीत गेल्यामुळे प्रचार करावा लागेल. त्यांचे माझे काही वैर नाही, असे जाधव म्हणाल्या. ज्यांच्यामुळे तुम्ही आमदार झाला त्या आमदार पाटील यांना कॉंग्रेस पक्ष सोडत असल्याची कल्पना दिली काय? यावर जाधव म्हणाल्या, त्यांनी मला विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज वाटली नाही. आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आमच्या राजकरणाला, समाजकरणाला पूर्णविराम मिळाला असता.

चौकट
दिवाळीनंतर फटाके फुटणार...
मंडलिक यांनी सांगितले की,शिवसेनेत उपनेत्या हे पद त्यांना दिले आहे. महिला सबलीकरणाचे काम त्या करतील. राजेश क्षीरसागर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतील. खासदार धैर्यशील माने, मी स्वतः राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज मुंबईत त्‍यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. दिवाळीनंतर जिल्ह्यात असे अनेक फटाके फुटणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com