
कोवाड - बुक्किहाळ घटना
0990
कोवाड ः बुक्किहाळ येथे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता विजयकुमार अडके घटनास्थळी ग्रामस्थांशी चर्चा करताना.
....
आश्वासनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोडले
बुक्किहाळ बुद्रुकप्रकरणी नुकसानभरपाई मिळवून देणार
कोवाड, ता. ४ ः बुक्किहाळ बुद्रुक (ता. चंदगड ) येथे शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या संतोष सुरेश बच्चेनहट्टी यांच्या मृत्यूवरुन संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री रोखून धरलेल्या अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री बारा वाजता सोडून दिले. त्यानंतर मयतावर अंत्यसंस्कार झाले.
दरम्यान, आज दुपारी गडहिंग्लजचे कार्यकारी अभियंता विजयकुमार अडके यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व या घटनेची चौकशी करुन मयताच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे संतोषचा बळी गेल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी महावितरणने तत्काळ त्याच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करावी, यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल लोदी, सहाय्यक अभियंता संजय मगदूम, अजित कांबळे यांना शुक्रवारी रात्री घटनास्थळी सात तास अडवून ठेवले होते. जोपर्यंत महावितरणचे अधिकारी कार्यवाही करत नाहीत. तोपर्यंत मयतावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. यावेळी राजू रेडेकर, प्रा. दिपक पाटील, जनार्दन देसाई, नरसिंग बाचूळकर यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्याना धारेवर धरले होते. संतोषच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली. त्याअनुषंगाने आज कार्यकारी अभियंता अडके यांनी बच्चेनहट्टी कुटूंबियांची भेट घेतली व ग्रामस्थांशी चर्चा करुन मयत संतोष बच्चनेहट्टीच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच गतवर्षी मयत झालेल्या म्हशींची नुकसान भरपाई देणे व विद्युत वाहिनीवरील दुरुस्तीची कामे तत्काळ करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपकार्यकारी अभियंता विशाल लोदी, संजय मगदूम, अजित कांबळे उपस्थित होते.