शाहू पुरवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू पुरवणी
शाहू पुरवणी

शाहू पुरवणी

sakal_logo
By

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा
संदेश देणारा लोकराजा

"आम्ही सर्व हिंदू आहोत. बंधू आहोत. हिंदू प्रजाजन कोणत्याही वर्णाचे असोत, कोणत्याही धर्माचे असोत, ते सर्व हिंदी आहेत. व्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्त्वाची असेल. पण, राष्ट्रीय बाबतीत ती केव्हाही आड येता कामा नये. यापूरती धर्म ही बाब कमी महत्त्वाची आहे, असे मला वाटते. धर्म शब्दाची थोडक्यात व्याख्या देवाजवळ पोहोचण्याचा मार्ग, अशी करता येईल. लंडन, मुंबई, कलकत्ता वगैरे मोठ-मोठ्या शहरांत सर्व बाजूंनी रस्ते येऊन मिळतात. म्हणजे सर्व ठिकाणच्या लोकांचा उद्देश त्या शहरी थोड्या वेळात व कमी श्रमाने पोचण्याचा असतो. त्यात त्याचप्रमाणे निरनिराळ्या देशांत व परिस्थितीत उत्पन्न झालेल्या धर्माचा उद्देशही तोच आहे. म्हणून भिन्नभिन्न रस्त्यांनी मुख्य शहराला पोचणार. या लोकांना एकमेकांचा द्वेष करण्याचे जसे कारण नसते. निरनिराळे धर्म पाळून ईश्वराजवळ पोचणाऱ्या लोकांनी तरी परस्परांचा द्वेष का करावा." नागपूर येथे ३० मे १९२० रोजी झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत समाजाच्या परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भाषणातील हे उद्‍गार. शाहू छत्रपतींनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी खास प्रयत्न केलेले दिसतात. विशेषतः त्यांनी कुराणाचे मराठी भाषांतर करण्यासाठी त्या काळात २५ हजार रुपये खर्च केले होते. त्यांनी सामाजिक एकोपा राखण्यासह सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
-डॉ. रमेश जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक


लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २ एप्रिल १८९४ ला राज्याभिषेक झाला. तत्पूर्वी महाराजांनी १८९२-९३ मध्ये कोल्हापूर संस्थानचा व आजूबाजूच्या खेड्यांचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्यांना आढळले की, दर दोन-तीन वर्षांनी पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी नागवला आहे. संस्थानातील प्राथमिक शाळांची अवस्था वाईट आहे. शाळेत शिक्षक नसतात. मुलेही थोडीच हजर असतात. सवर्णांच्या शाळेत जी खालच्या जातीची मुले असतात, त्यांना वर्गाच्या बाहेर बसावे लागते. शिक्षक त्यांना मारण्यासाठी छडीचा वापर लांबूनच करत होते. ही सर्व दृश्ये पाहिल्यानंतर त्यांनी मनाशी काही निर्णय घेतले. त्यातील पहिला महत्त्वाचा निर्णय असा की, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. म्हणून त्यांनी प्रथम तथाकथित उच्च जातींबरोबर तथाकथित खालच्या जातींना येण्यासाठी त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व दृष्टिकोनातून सफल करणे महत्त्वाचे असे ठरवून पावले टाकली.

* सर्वसाधारण कोल्हापूर संस्थानात दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळ पडतो, हे शाहू छत्रपतींनी जाणले होते. लोकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध होईल, यासाठी दुकाने उघडली. त्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूही योग्य दरात उपलब्ध होतील, याची काळजी घेतली. इतकेच नव्हे तर काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद केली. साठेबाजीला आळा घातला. या पद्धतीने महाराजांनी विविध प्रकारची कामे हाती घेतली. १८९६-९७ च्या दरम्यान भारतात जो महाभयंकर दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळात देशात एकूण १० लाख लोकांचा मृत्यू झाला. परंतु, कोल्हापूर संस्थानात एकही दुष्काळ बळी गेला नाही. यादरम्यान ए रायटर या जागतिक वृत्तसंस्थेचे स्पेशल फेमिन कमिशनचे मेरी वेदर नावाचे एक पत्रकार कोल्हापुरात आले होते आणि त्यांना शाहूंनी संस्थानातील दुष्काळाची आम्ही कशाप्रकारे उपायोजना करतो, त्याची माहिती दिली. तो मेरी वेदर कोल्हापूर सोडून विजापूरकडे निघाला. तोपर्यंत त्याच्या कानावर एक बातमी पोचली, ती अशी की, शाहूंनी संस्थानातील सर्व राखीव जंगले शेतकरी व धनगरांच्या जनावरांसाठी खुली केली आहेत. त्यावेळी तोंडी उद्‍गार येतात, अशा लोकराजाला आपल्या हृदयसिंहासनावर का बसवणार नाहीत.

* कोल्हापूर संस्थानात १८८३ मध्ये राजाराम कॉलेज सुरू झाले. त्या कॉलेजला जोडून एक वसतिगृह होते. त्या वसतिगृहात सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. परंतु, त्या ठिकाणी असणारे उच्च जातीचे विद्यार्थी तथाकथित खालच्या जातींतील विद्यार्थ्यांना त्रास देत. त्यांना पाण्याच्या भांड्याला हात लावू देत नसत. त्यांच्यापासून जेवण वेगळे घेत. हे लक्षात आल्यानंतर शाहू छत्रपतींनी जातवार वसतिगृहांची निर्मिती केली. एका भाषणात ते म्हणाले होते, "There is castewise meeting to end the caste." आपण जातवार सभा भरवूया. परंतु, त्या सभांचा उद्देश जातिसंस्था नष्ट करणे हा असला पाहिजे म्हणून कोल्हापूर संस्थानात महाराजांनी जातवार २२ वसतिगृहे उभारली उघडली. त्याबरोबर रुकडी येथे एक वसतिगृह सुरू केले.

* शाहू छत्रपतींनी शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होणार नाही. समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे हेच महत्त्वाचे कार्य आहे. म्हणून त्यांनी १९१७ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा कायदा केला. तसेच १२ जून १९१८ रोजी प्रिन्स शिवाजी यांच्या मृत्यूनंतर इंदूमती राणीसाहेबांना शिक्षण देण्यासाठी त्यांचे जवळचे मित्र वा. द. तोफखाने यांच्या देखरेखीखाली त्यांच्या शिक्षणाची खास व्यवस्था केली. त्या बरोबरच त्यांच्या शिक्षणाकडे शाहू छत्रपतींनी जातीने लक्ष दिले.

* वेदोक्त प्रकरणात शाहू छत्रपतींना तथाकथित वरच्या जाती तथाकथित खालच्या जातींचा कसा छळ करतात, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हापासून त्यांनी हिंदू समाजातील वर्ण, जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून १९१८ मध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा कोल्हापूर संस्थानात मान्य केला. त्याबरोबरच धनगर व मराठे यांचे आंतरजातीय विवाह खास घडवून आणले. जातीसंस्था नष्ट करण्यासाठी शाहू छत्रपतींनी आपल्याच घराण्यातील काही उदाहरणे प्रत्यक्ष प्रजेसमोर ठेवली. उदाहरणार्थ त्यांचे चुलत भाऊ काकासाहेब यांची कन्या चंद्रप्रभा हिचा विवाह इंदूरचे तुकोजीराव होळकर यांचे चिरंजीव यशवंतराव होळकर यांच्याशी निश्चित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर १९२४ मध्ये हा विवाह घडून आला. त्याचा सविस्तर वृत्तांत श्रीपतराव शिंदे यांच्या विजयी मराठाच्या तत्कालीन अंकात वाचावयास मिळतो.

* हिंदू समाजात धर्म सिंहासनाच्या आधारे वर्ण जातीव्यवस्था निर्माण करून समाजात व्यक्तिस्वातंत्र्य, समता, लोकशाही, बंधुत्व, एकता यासारखी मूल्ये नष्ट केली होती. लोकांचा छळ केला जात होता. महाराजांनी १९१९ च्या दिवाळी पाडव्याच्यानिमित्त त्यांनी खास क्षेत्र जगद्गुरुपद निर्माण केले. त्यावर बेनाडीकर पाटलांची नेमणूक केली. त्यांना अशा प्रकारची धर्मपीठे निर्माण करण्यात काडीचे स्वारस्य नव्हते. परंतु, तो एक मधला टप्पा म्हणून त्याचा त्यांनी वापर केला. अशी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची साक्ष आहे. त्यातूनच त्यांनी शिवाजी वैदिक स्कूल निर्माण केले. घरचा पुरोहित यासारखी भास्करराव जाधव यांच्या संपादनाखाली पुस्तिका तयार केली.

* शाहू महाराजांनी शेती, उद्योग, संगीत, नाट्य, चित्रकला, शिल्पकला, चित्रपट आदींबाबत अनेक नवनवीन प्रयोग केले. राधानगरी धरणासारख्या प्रकल्पातून कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम केला. पन्हाळगडावर चहा-कॉफी सारखी नवीन पिके काढण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी-विक्री व्यवस्था कार्यक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून शाहूंनी प्रयत्न केले. शाहू मिलसारखा सुती कापड निर्माण करणारा उद्योग सुरू करून त्या काळात तीन हजार लोकांना रोजगार दिला. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, दत्तात्रय बळवंत पारसनीस, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या इतिहासकारांना मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी सर्व प्रकारचे साह्य केले. संस्थानातील विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे, बडोद्याचे जागृतीचे संपादक भगवंतराव पाळेकर, प्रबोधनचे प्रबोधनकार ठाकरे, विद्याविलासचे संपादक आदींना आर्थिक मदत देऊन ते पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले. विशेषतः संदेशचे अच्युत बळवंत कोल्हटकर यांना त्यांनी त्यांच्या पत्रकासाठी चार हजार रुपयांची मदत दिली होती आणि ती मदत देत असताना त्यांचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रात ते लिहितात की, "मी तुम्हाला ही आर्थिक मदत करतो म्हणून तुम्ही माझ्या बाजूनेच पत्रकात लिहिले पाहिजे, असे नाही. मी जर चुकत असेन तर त्याच्यावर जरूर टीका करा." यात पत्रकारांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा वाणी व लेखणीच्या स्वातंत्र्याला ते किती महत्त्व देत होते, हे सहज लक्षात येते. थोडक्यात असा हा राजा १९१८ नंतर राष्ट्रीय नेता बनून या देशातील केवळ बहुजन समाज नव्हे तर एकूण सर्व जनकल्याणाचा विचार करून त्यांनी पावले उचललेली दिसतात. म्हणूनच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० मध्ये घेतलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेला जातीने हजर राहिले होते.

*शाहू छत्रपतींनी मुस्लिमांच्या शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून खास मुस्लिम वसतिगृह स्थापन केले. अनेक मुस्लिम व्यक्तींना वकिलीच्या सनदा दिल्या. याबरोबरच २१ मार्च १९१८ रोजी त्यांची ज्येष्ठ कन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब महाराज यांच्या विवाहावेळी अनेक मुस्लिम व्यक्तींचे विवाह लावून दिले. त्याबरोबरच रायबाग येथे श्री शाहू असोसिएशन ही संस्था सुरू केली आणि त्या ठिकाणी २० मुस्लिम कुटुंबांना काम दिले.

*कोल्हापूर नगरपालिकेच्या सभासद निवडणुकीसाठी हिरा मादार भंगी यांनी अर्ज भरला होता. परंतु तो अर्ज चुकीचा भरला होता. म्हणून त्यांचा अर्ज रद्द केला गेला. त्यात शाहू छत्रपतींनी लक्ष घालून त्यांनी हिरा मादार भंगी या मुस्लिम व्यक्तीची खास नेमणूक केली.

* संस्थानातील अनेक ठिकाणच्या मशिदी आणि दर्गे यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी शाहू छत्रपतींनी खास जागा व आर्थिक मदत केल्याचे दिसून येते. ६ फेब्रुवारी १९०४ रोजी शाहूपुरीतील मशीद बांधण्यास जागा व मंजुरी दिल्याची नोंद आहे. हिंदू देवालयाचे उत्पन्न मशिदीच्या दुरुस्तीसाठी लावून दिल्याच्या काही नोंदी मिळतात. उदाहरणार्थ पाटगाव येथील मशिदीसाठी मौनी महाराजांच्या मठाच्या उत्पन्नातून ३०० रुपयांची मदत केल्याचे २ सप्टेंबर १९१९ चा हुकूम आहे.

*विशेषत: या बरोबरच अनेक मुस्लिम कलावंतांना विशेषतः गाणं सम्राट अल्लादियाखाँ यांना आर्थिक मदत दिल्याचे दिसते. अंबाबाईच्या मंदिरात त्यांना त्यांचे गायन करण्याची परवानगी दिली. चित्रकला तपस्वी आबालाल रहमान यांच्याही पाठीशी ते उभे असल्याचे दिसतात. कोल्हापुरात पठाण नावाच्या गृहस्थांना दि शाहू रॉयल फोटो आर्ट स्टुडिओ सुरु करण्यास प्रोत्साहन व आर्थिक मदत दिली आणि त्याबरोबरच कुस्ती क्षेत्रात गामा, गुंगा, इमामबक्ष, भोला पंजाबी आदी अनेक मुस्लिम पैलवानांना त्यांनी आर्थिक मदत आणि प्रोत्साहन दिले. भोला पंजाबीला पन्हाळ्यावर घर दिल्याचा हुकूम पहावयास मिळतो. थोडक्यात, शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानात हिंदू-मुस्लिम ऐक्य कसे जोपासले जाईल, याकडे लक्ष दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09827 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top