
फुटबॉल
21835
कोल्हापूर ः सतेज फुटबॉल स्पर्धेत शनिवारी उपांत्य फेरीतील सामन्यात शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील चुरशीचा क्षण. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
खंडोबावर मात करीत
शिवाजी मंडळ अंतिम फेरीत
दिलबहार तालीम मंडळाविरुद्ध आज जेतेपदासाठी लढत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत शनिवारी शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर ३-० अशा गोल फरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. शिवाजी मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात उद्या (ता. १५) अंतिम सामना होईल. पाटाकडील तालीम मंडळातर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे.
शिवाजी मंडळाकडून नवव्या मिनिटाला योगेश कदम याने फटकावलेला चेंडू खंडोबा मंडळाच्या गोलजाळीत विसावला. त्यानंतर खंडोबाच्या खेळाडूने शिवाजी मंडळाच्या संकेत साळोखे याला डीमध्ये अवैधरीत्या अडविले. मुख्य पंच प्रदीप साळोखे यांनी शिवाजी मंडळाला पेनल्टी किक दिली. त्यावर विक्रम शिंदे याने १४ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला २ विरुद्ध ० अशी आघाडी मिळवून दिली. खंडोबाच्या खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण ठेवत सातत्याने शिवाजी मंडळाच्या गोलीजाळीवर चढाया केल्या; मात्र समन्वयाअभावी मिळालेल्या संधींचे त्यांना गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. शिवाजी मंडळाकडून रणवीर जाधवने ३९ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात खंडोबाकडून श्रीधर परब, कुणाल दळवी, दिग्विजय आसनेकर, प्रतीक सावंत यांनी उत्कृष्ट खेळ केला. मात्र, त्यांना गोल करण्याची किमया साधता आली नाही.
शिवाजी मंडळाच्या विक्रम शिंदे याने फ्री किकवर मारलेला फटका गोलजाळीच्या वरच्या खांबाला लागून मैदानाबाहेर गेला. त्यानंतर त्याने पुन्हा फ्री किकवर मारलेला चेंडू खंडोबाचा गोलरक्षक रणवीर खालकरने उत्कृष्टरीत्या रोखला. करण चव्हाण-बंदरे याला गोल नोंदविण्याची नामी संधी चालून आली होती. त्याने फटकावलेला चेंडू मात्र खंडोबाच्या गोलजाळीवरून गेला. या सामन्यात खंडोबाच्या प्रतीक सावंत याला गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
अंतिम सामना तिकीट विक्री दुपारी एकपासून
अंतिम सामना उद्या (ता. १५) दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी, दुपारी एकपासून तिकीट विक्री सुरू राहणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09884 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..