जत्रा आंब्याची.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जत्रा आंब्याची..
जत्रा आंब्याची..

जत्रा आंब्याची..

sakal_logo
By

२२९७५

काही तासांत सव्वा लाखाची उलाढाल
उत्पादक ते ग्राहक; जत्रेत तब्बल सहा टन आंब्याची विक्री
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : कोल्हापुरी गोड माणसाला रसाळ आंबा कसा आवडतो, याचे प्रत्यंतर आज येथे आले. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ‘जत्रा आंब्याची’ उपक्रमाचे उद्‍घाटन होताच अवघ्या काही तासांत सव्वा सहा लाख रुपयांची उलाढाल झाली. जत्रेत आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या हाती खरेदी केलेली आंब्याची पेटी, असेच समीकरण दिसून आले. तब्बल सहा मेट्रिक टन आंब्यांची विक्री झाली. पहिल्याच दिवशी जत्रेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमित्त होते लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित आंबा जत्रेचे. जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळातर्फे श्री शाहू छत्रपती मिल येथे त्याचे आयोजन केले आहे.
बांधावरुन थेट ग्राहकांपर्यंत संकल्पनेतून जत्रा आंब्याची अंतर्गत उत्पादकांच्या आंब्याला शाहू मिल येथे थेट बाजारपेठ उपलब्ध केली आहे. माफक दरात आंब्याची विविध प्रजाती उपलब्ध केल्या आहेत. देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी, बिटक्या, केंट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फरणांडीन, दूधपेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलमसह वनराज व किट हे शुगर फ्री प्रजातीचे आंबे जत्रेत उपलब्ध केले आहेत.
आंब्याच्या खरेदीसाठी ग्राहक सकाळीच मिलमध्ये हजर होते. दुपारी तीन वाजता जत्रेचे उद्‍घाटन होणार असले तरी ग्राहकांची आंबे खरेदीसाठीची धडपड लक्ष वेधणारी होती. अठराहूनहून अधिक प्रजातींचे आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून,
प्रत्येक प्रजातीच्या आंब्याचे दर ग्राहकांकडून विचारले जात होते. अठरा उत्पादकांच्या स्टॉलसमोर त्यांची गर्दी होती.
पहिल्या दिवशी तब्बल सहा टन आंब्यांची विक्री झाली असून, यातून अंदाजे सव्वा सहा लाखांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असल्याची माहिती उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी तीन वाजता जत्रेचे उद् घाटन झाले. उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे उपस्थित होते.

कोट
उपक्रमामुळे उत्पादकाला फायदा झाला. इथले ग्राहक चोखंदळ असल्याची प्रचिती आली. आंबे खरेदीसाठी ग्राहकांनी दरात तडजोड न करता चांगला माल खरेदी केल्याचे समाधान आहे.
- रवींद्र पाटील, आंबा उत्पादक, कणकवली


उपक्रमाचे कौतुक
आंबा खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला. अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे आंबा उत्पादक भारावून गेले. थेट ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल झाली. आंबा उत्पादकांनी जिल्हाधिकारी रेखावार यांचे उपक्रमाबाबत कौतुक केले.