क्रीडा सुविधांकडे दुर्लक्षच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sport
सिटीझन एडिटर

क्रीडा सुविधांकडे दुर्लक्षच

कोल्हापूर - शहरातील तालीम, मंडळे, संघटनांना एखाद्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या आवाजाची ध्वनीयंत्रणा आणण्यासाठी लाख रुपये देण्याची समाजातील विविध घटकांची तयारी आहे. क्रीडा क्षेत्रात भरारी मारू पाहणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष देण्यासाठी मात्र या घटकांना वेळ नाही. विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकाम अर्धवट पडले असले तरी डोळ्यावर कातडे ओढून लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ही भूमी क्रीडानगरी असल्याचा गाजावाजा करायचा मात्र, क्रीडा नगरीच्या उज्‍ज्वल भविष्यासाठी क्रीडा सुविधांकडे दुर्लक्ष करायचे, असे चित्र दिसत आहे, अशी प्रतिक्रिया सकाळ माध्यम समूहाच्या ‘सीटिझन एडिटर’ उपक्रमात क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केल्या.

पदक मिळविण्याची गुणवत्ता असणाऱ्या खेळाडूंना शोधा

आमच्या युवावस्थेत कुस्तीच्या कोणत्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. फक्त आखाड्यात जाऊन कुस्ती करायची एवढेच माहीत होते. आता कुस्तीतील तंत्रात खूप मोठे बदल झाले आहेत. ऑलिम्पिकला जायचे म्हटले तर मॅटवरील कुस्तीशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणे तितकेच गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागातील पैलवानांत कौशल्य असून, त्यांची केवळ सोयी-सुविधांविना पिछेहाट होत आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांना रामराम ठोकावा लागत आहे. एखाद्या पैलवानाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्यानंतर त्याला डोक्यावर घेऊन नाचले जाते. मात्र, तिथंपर्यंत पोचण्यासाठी त्याने केलेल्या कष्टाची कोणीच दाद घेत नाही. खरेतर पदक मिळविण्याची गुणवत्ता असणाऱ्या खेळाडूंना शोधून आधीच त्यांना सुविधा पुरवायला हव्यात.

- राम सारंग, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते.

-ज्येष्ठ प्रशिक्षकांचा शोध घेऊन नवोदितांना प्रशिक्षण द्यावे
-कुस्तीतील तंत्र समजून देण्यासाठी कार्यशाळा घ्याव्यात
-पैलवानांना दत्तक घेऊन आर्थिक मदत करावी

पेठा-पेठांतील ईर्षेसाठी खेळात उतरणे चुकीचे

विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात गोडी निर्माण करण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी वेळ दिला पाहिजे. शासकीय स्पर्धातील प्रमाणपत्र करिअरला कशी उपयोगी ठरू शकते, याची त्यांनी माहिती द्यायला हवी. करिअरसाठी कोणते खेळ महत्त्‍वाचे आहेत, त्याची माहिती पालक, शिक्षकांसह विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. अन्यथा एखाद्या खेळात पेठा-पेठांतील ईर्षेसाठी उतरणे चुकीचे आहे. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर अॅस्ट्रोटर्फ होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकीचे मैदान खेळाडूंना उपलब्ध होत आहे. मात्र, अन्य खेळांच्या मैदानाचे काय, हा प्रश्‍न मागे उरतो. त्यातही सगळेच पालक पाल्याला तेंडुलकर करायला उठले आहेत. त्यांनी पाल्याचा खेळ पाहून खेळ निवडावा. क्रीडा क्षेत्रात राजकीय ईर्षा असता कामा नये. त्याचबरोबर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवून शासकीय नोकरी मिळाल्यानंतर खेळाडूंनी खेळाला विसरू नये. शासन एखाद्या क्रीडा प्रकारात प्रकाराच्या विकासासाठी निधी द्यायला तयार आहे. त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

- विजय साळोखे-सरदार, ज्येष्ठ हॉकीपटू

-विभागीय क्रीडा संकुलाचे अर्धवट काम पूर्ण करा
-क्रीडाशिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी
-पाल्याचा कल पाहून खेळ निवडा

क्रीडा शिक्षक भरती होत नसल्याने करिअरबाबत प्रश्न
मुलांना लहानपणापासून कोणत्या खेळात आवड आहे, याची माहिती घ्यायला हवी. क्रीडा शिक्षक भरती होत नसल्याने क्रीडा क्षेत्रातील करिअरचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही शाळेत खेळाचे तास कमी झाले आहेत. परिणामी मुलांना खेळातील माहिती कशी कळणार? तंत्रशुद्ध माहिती असल्याशिवाय त्यांना स्वतःला घडवताना येणार नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नसताना कोल्हापुरातल्या खेळाडूंनी विविध खेळात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले टॅलेंट दाखवले आहे. अलीकडच्या काळात पालकांकडून मुलांना खेळासाठी प्रवृत्त केले जात असले तरी पाल्याचा रिझल्ट किती वर्षात येईल, अशी त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होते. तत्पूर्वी, त्यांनी पाल्याची बोनटेस्ट करणे गरजेचे आहे. त्यावेळेस त्यांना पाल्याला नेमक्या कोणत्या खेळात घालायचे हे कळेल. खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच अभ्यासात गुण कमी असले तरी पाल्याच्या खेळाला ब्रेक लागता कामा नये, याची पालकांनी दक्षता घेतली पाहिजे.

- उमा भोसले-भेंडिगिरी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू.

-मुलांच्या बोन टेस्टबाबत जनजागृती व्हावी
-पाल्याची खेळापासून नाळ तोडू नका
-लोकप्रतिनिधींनी सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्यावा

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंना थेट नियुक्तीद्वारे नोकरी द्यावी
रग्बीसारख्या खेळात ग्रामीण भागातील ९९ टक्के आहेत. चार मुली राष्ट्रीय स्तरावर खेळल्या असून, काही खेळाडू शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. ग्रामीण भागात कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. भात, भाकरी, आमटी, भाजी खाऊन खेळाडू त्यांच्यातील कौशल्य दाखवत आहेत. याच काळात त्यांना चांगल्या सुविधा दिल्या तर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर हे नाव चमकवतील, यात शंका नाही. निधीचा विचार करता नंदुरबार जिल्ह्याला क्रीडा निधी मंजूर झाला आहे. तसा कोल्हापूरला निधी उपलब्ध व्हायला हवा. ज्या संस्था चांगले काम करतात त्यांना निधी मिळायला हवा. लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित काम करून मैदानांच्या विकासाकडे लक्ष द्यावे. नेता नाही म्हणून कार्यकर्त्याला निधी नाही, हे धोरण चुकीचे आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी बोन टेस्टची सुविधा उपलब्ध करायला हवी. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना थेट नियुक्तीद्वारे नोकरीत सामावून घ्यायला हवे. कंपन्यांचा सीएसआर फंड संघटनांना मिळाला तर खूप मोठा बदल घडेल. खेळाडूंच्या आहाराबाबत जनजागृती नसणे ही मोठी शोकांतिका आहे.

- दीपक पाटील, प्रशिक्षक, रग्बी.

-लोकप्रतिनिधींनी मैदानांच्या विकासाकडे लक्ष द्यावे
-अर्धवट क्रीडा संकुलांचे काम पूर्ण करा
-ऑलिंपिक खेळांची खेळाडूंना ओळख करून द्यावी

सायकल खरेदीसाठी शासनाने निधी द्यावा

माझा मुलगा अक्षय लहान असताना त्याला स्केटिंग खेळासाठी प्रोत्साहन दिले. सव्वा दोन वर्षे त्याने स्केटिंग केल्यानंतर त्याला फुटबॉल शिबिरासाठी पाठवले. फुटबॉलमधील करिअरचा वेध घेऊन त्याला सायकलिंगला घातले. मात्र, सायकलची किंमत बारा लाख रुपये असल्याचे लक्षात आले. तेवढी आर्थिक कुवत नसल्याने ऐंशी हजार रुपयाची सेकंड हँड सायकल त्याला घेऊन दिली. पुढे त्याला बालेवाडीला प्रवेश मिळवून दिला. या काळात अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर दोन-तीन पदके मिळवूनही त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचे लक्षात आले. क्रीडा व शिक्षण क्षेत्राचा मेळ असल्याखेरीज करिअरला दिशा मिळणार नाही, याची जाणीव पक्की झाली. परिणामी मुलाच्या करिअरला दिशा देण्यासाठी त्याला बीपीएड अथवा एमपीएड करण्याचे ठरवले. कोल्हापूर जिल्ह्यातील या अभ्यासक्रमाची महाविद्यालये बंद झाली आहेत. खेळामध्ये करिअर कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. अखेर त्याला एनआयएस प्रशिक्षक होण्यासाठी पतियाळात दाखल केले आहे.

- संदीप कारेकर, पालक

-शिवाजी विद्यापीठाने नव्या खेळांचे संघ विविध स्पर्धांत पाठवावेत
-बीपीएड, एमपीएड कॉलेज सुरू करण्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
-क्रीडा व शिक्षण क्षेत्राचा मेळ घालणारी व्यवस्था तयार करावी

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b09921 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapursports
go to top