
पान २
26953
26954
युद्धकलेचा थरार अन् शाहिरीची ऊर्जा
रायगड गजबजला : आज शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
रायगड, ता. ५ : शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी होळीचा माळ आज थरारला. शाहिरीच्या गगनभेदी आवाजाने राजसदर शौर्यरसात रोमांचित झाली, तर गडदेवता शिरकाई देवीच्या गोंधळात शिवभक्त हातात दिवट्या घेऊन नाचले. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. सोमवार (ता. ६) युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य सोहळा होणार आहे.
संभाजीराजे व शहाजीराजे गड पायथ्यापासून गडावर पायी आले. शिरकाई मंदिरासमोर त्यांचे ढोल-ताशाच्या ठेक्यात स्वागत झाले. गडपूजन झाल्यानंतर होळीच्या माळावर ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश जाधव व वस्ताद दत्तू पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. ‘धार तलवारीची...युद्धकला महाराष्ट्राची,’ उपक्रमात लाठी, पट्टा, फरी गदका, विटा, लिंबू काढणीच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. जिजा मर्दानी आखाडा (गडहिंग्लज), शिव शाहू मर्दानी आखाडा (कोल्हापूर), शौर्य मर्दानी आखाडा (सातारा), शिवरत्न शिवकालीन मर्दानी आखाडा (करकंब), स्वराज्य मर्दानी संघ (केम, ता. करमाळा), किल्ले रामसेज फाउंडेशन (मानोरी, जि. नाशिक), जय मल्हार ग्रुप (सातवे, ता. पन्हाळा), छावा प्रतिष्ठान (नवी मुंबई), शिवछत्रपती मर्दानी आखाडा (निगवे खालसा), सह्याद्री प्रतिष्ठान (कोल्हापूर), वीरभद्र तालीम (आरे), श्रीमंत योगी मर्दानी आखाडा (पाडळी खुर्द) यांनी प्रात्यक्षिके सादर केली.
राजसदरेवर सादर झालेल्या ‘जागर शिवशाहिरांचा हिंदवी स्वराज्याचा,’ कार्यक्रमाने शिवभक्तांच्या अंगातील ऊर्जा चेतवली. शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी, शाहीर सम्राट देवानंद माळी (सांगली), शाहीर सुरेश जाधव (औरंगाबाद), शाहीर राजेंद्र कांबळे (अकलूज), शिवशाहीर दिलीप सावंत (कोल्हापूर), यशवंत जाधव (औरंगाबाद), अजिंक्य लिंगायत (औरंगाबाद), स्वप्निल डुंबरे (सिन्नर-नाशिक), कल्पना माळी (सांगली), दीप्ती व तृप्ती सावंत (कोल्हापूर) यांनी त्यात सहभाग घेतला. रायगडावरील विकासकामांची माहिती दिल्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ घालण्यात आला. दरम्यान, संयोगिताराजे छत्रपती यांनी शनिवारी (ता. ४) गडावर हजेरी लावून सर्व समित्यांच्या कामकाजाची पाहणी केली. त्यांनी महिलांच्या सोयींवर विशेष लक्ष दिले. तसेच शिवभक्तांना कोणतीच अडचण येणार नाही, यासाठी समितीच्या सदस्यांना सूचना केल्या. राजसदरेवरील सजावटीसाठी त्या रात्री साडेबारा पर्यंत थांबल्या होत्या.
...........
चौकट
- साडी चोळी देऊन गडावरील महिलांचा सन्मान
- शिवभक्तांच्या गर्दीने गड फुलला
- बाजारपेठेत छावण्यात राहण्याची सोय
- होळीच्या माळावर पिण्याच्या पाण्याची सोय
- बा रायगड, सेवेची ठाई तत्पर, दुर्ग रक्षक, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते गडावर
- शिवभक्तांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
- गड पायथ्याचे पार्किंग हाऊसफुल्ल
- अन्नछत्रासमोर मोठ्या रांगा
- अथांग मुजूमदारची दिलखेचक लाठी फेक
........
विना शुल्क फेटे बांधण्याचे काम
कोल्हापुरातील सोन्या मारुती चौकामध्ये राहणारे दयानंद हुबाळे यांनी हातावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे चित्र गोंदून गडावर हजेरी लावली. यंदा शाहू महाराज यांचे शताब्दी वर्षानिमित्त त्यांनी अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. शिवभक्तांना विना शुल्क फेटे बांधण्याचेही काम केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10001 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..