
पान २
सांगा माने आमचं काय चुकलं!
संतप्त शिवसैनिकांचा खासदार माने यांना सवाल ; घरावरील मोर्चा अडविल्याने ठिय्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता २४ : ‘तुमचा गट संपला होता तरी तुम्हाला लोकसभेचे तिकीट दिले, कुठलीही अपेक्षा न करता शिवसैनिकांनी अहोरात्र प्रचार केला,
स्वाभिमानी जनतेने तुम्हाला संसदेत पाठवले तरी तुम्ही शिवसैनिक आणि स्वाभिमानी जनतेशी गद्दारी केली. खासदार माने सांगा आमचं काय चुकले?
असा सवाल संतप्त शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांना केला. आज शिवसैनिकांनी माने यांच्या घरावर मोर्चा काढला होता.
बाजार समिती येथून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. हातात भगवे झेंडे आणि फलक घेऊन शिवसैनिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.
नानानानी पार्कजवळ पोलिसांनी मोर्चाला अडवले. यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. ''धैर्यशील माने गद्दार है'', उध्दव साहेब चिंता नसावी, आम्ही तुमच्या सोबत,'' ''गेले ते कावळे राहिले ते मावळे,'' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, ''जिल्ह्यात माने गट पूर्ण संपला होता. आर्थिकदृष्ट्या ही माने अडचणीत होते. पण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील माने यांना लोकसभेचे तिकीट दिले. शिवसैनिकांनी पदरचे पैसे खर्च करून माने यांचा प्रचार केला आणि त्यांना निवडून आणले.
खासदार झाल्यावर लगेचच त्यांना प्रवक्तेपद दिले. पण याची जाणीव न ठेवता त्यांनी गद्दारी केली. पुढच्या निवडणुकीत स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून त्यांनी निवडणूक जिंकून दाखवावी. स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवेल. दरम्यान शिवसैनिकांनी बॅरिकेट तोडून माने यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.मोर्चात जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
--------------------------------------
पोपटाला पेरू दिसला
यावेळी रविकर इंगवले म्हणाले, ''धैर्यशील माने सतत बोलत होते म्हणून त्यांना बोलका पोपट म्हणतात. आता पोपटाला पेरू दिसला त्यामुळे तो तिकडे गेला.''
आजोबा स्वाभिमानी...
मुरलीधर जाधव म्हणाले, धैर्यशील यांचे आजोबा दिवंगत खासदार बाळासाहेब माने हे अत्यंत स्वाभिमानी होते त्यांनी कधी भूमिका बदलली नाही नातवाने मात्र भूमिका बदलली.
पोलिसचजास्त
मोर्चात कार्यकर्त्यांची संख्या कमी होती, मात्र त्या तुलनेत पोलीस बंदोबस्त अधिक होता. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. कार्यकर्ते कमी पण पोलीस जास्त अशीच परिस्थिती होती.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10229 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..