
महावितरण गुन्हा
माणगावच्या दोघांवर
वीज चोरी केल्याचा गुन्हा
मीटरमध्ये फेरफार करून ९४ हजार युनिट वीज चोरी
कोल्हापूर, ता. २ : माणगाववाडी (ता. हातकणंगले) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकाची वीज चोरी भरारी पथकाने पकडली. ग्राहकाने वीज मीटरचा डिस्प्ले चालू वा बंद करता येईल, अशा पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करून ९४ हजार ९८५ वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे १४ लाख ८९ हजारांची वीज चोरी केली. या प्रकरणी सागर बजरंग कांबळे व वीज वापरकर्ते शहाबुद्दीन रोजअली खान यांच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, माणगाववाडी (ता. हातकणंगले) येथील वीजग्राहक नामे समर्थ चर्मकार माग औद्योगिक संस्थेच्या वीज मीटरची तपासणी १४ जून २०२२ ला केली. मीटरचा डिस्प्ले वारंवार चालू वा बंद करण्याची योजना ग्राहकाने केली होती. ही बाब स्थळ तपासणी व मीटर नोंदी संग्राहक प्रणालीच्या अहवालानुसार उघडकीस आली. वीज चोरीच्या निर्धारित दहा महिने कालावधीत ९४ हजार ९८५ युनिटची वीज चोरी केली आहे. ग्राहकास चोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार १४ लाख ८९ हजार ९२० व तडजोडीचे रक्कम ९ लाख १० हजार रुपये इतके बिल देण्यात आले. मात्र, नोटीस देऊनही ग्राहकाने बिल भरले नाही. महावितरणच्या फिर्यादीनुसार समर्थ चर्मकार माग औद्योगिक संस्था मर्यादितचे अध्यक्ष सागर बजरंग कांबळे व वीज वापरकर्ते शहाबुद्दीन रोजअली खान यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, सहायक अभियंता नितीन जोशी, साजणे शाखा अभियंता यु. आर. कदम, वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कोरवी, निखिल कांबळे यांनी कारवाई केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10257 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..