काळसेकर पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळसेकर पुरस्कार वितरण
काळसेकर पुरस्कार वितरण

काळसेकर पुरस्कार वितरण

sakal_logo
By

९९८५

लिंगभेदाचे राजकारण नाहीसे करण्याची गरज
प्रा. अविनाश सप्रे; वसंत आबाजी डहाके, दिशा पिंकी शेख यांना काळसेकर पुरस्कार
कोल्हापूर, ता. ३ : मानवमुक्तीचा स्वर मोठा होण्यासाठी साहित्यातील आणि समाजातील लिंगभेदाचे राजकारण नाहीसे करण्याची तीव्र गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठातर्फे सतीश काळसेकर काव्य पुरस्कार २०२२ व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार २०२२ सोहळ्यात ते बोलत होते. प्रा. सप्रे यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी व समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना सतीश काळसेकर काव्य पुरस्कार, तर दिशा पिंकी शेख यांना ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार दिला. अनुक्रमे २१ हजार रुपये व दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला.
प्रा. सप्रे म्हणाले, ‘‘मी कवी आहे, म्हणून मी आहे,’ असे म्हणणारा ओतप्रोत कवी माणूस म्हणजे डहाके आहेत. साठोत्तरी कालखंडातली मराठीतील श्रेष्ठ दर्जाची कविता त्यांची आहे. त्याचप्रमाणे घडणाऱ्या-बिघडणाऱ्या वर्तमानाचे दर्शन घडविणारीही त्यांची कविता आहे. मूलभूत तात्त्विकतेची मांडणी करणारा सर्जनशील कादंबरीकार आणि चिंतनशील ललितलेखकही ते आहेत. मराठी साहित्याकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देणारे विचारवंतही ते आहेत. साहित्यातील सृजनाच्या अनेकविध शक्यता लक्षात घेऊन व्यक्त होणारा सर्वव्यापी, श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणून त्यांनी मराठीत त्यांचे स्थान अधोरेखित केले आहे. दिशा पिंकी शेख या तर भोवतालातील सारी कुरूपता अधोरेखित करणाऱ्या कवी आहेत.’’
श्री. डहाके म्हणाले, ‘‘सतीश काळसेकर यांच्या नावे पुरस्कार मिळण्याचा हा क्षण एकाच वेळी आनंददायी आणि वेदनादायकही असल्याचे बोलून दाखविले. सतीश काळसेकर यांनी थोडकीच पण लक्षवेधी, चिरस्मरणीय कविता लिहिली. त्याचप्रमाणे कवितेची दखल घ्यावयास लावणारी समीक्षाही त्यांनी लिहिली.’’
दिशा पिंकी शेख म्हणाल्या, ‘‘आमच्या लेखण्यांना सामर्थ्य देण्याचे काम विद्यापीठांनी आणि शिक्षण व्यवस्थेने करावे. विषमतेचे डोस आपण मुलांना लहानपणापासून देतो. आपल्यातला बंधू-भगिनीभाव आता मित्रत्वाच्या, समतेच्या पातळीवर आणण्याची गरज आहे. जेव्हा पोट भरलेलं असते, तेव्हाच पावसातल्या मातीचा सुगंध घ्यावासा वाटत असतो.’’
मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुरस्काराच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट केली. मानसी काळसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
सुप्रिया काळसेकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. जी. कुलकर्णी, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रभा गणोरकर, डॉ. उदय नारकर, डॉ. माया पंडित, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. अरुण शिंदे, डॉ. रघुनाथ कडाकणे, तनुजा शिपूरकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10270 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top