उमेश कदम पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेश कदम पत्रकार परिषद
उमेश कदम पत्रकार परिषद

उमेश कदम पत्रकार परिषद

sakal_logo
By

जनभाषेतील साधने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणार
प्रा. उमेश कदम; राज्यातील अपरिचित शूरवीरांच्या इतिहासाला देणार उजाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : मराठ्यांचा इतिहास राष्ट्रीय स्तरावर पोचविण्यासाठी जनभाषेतील साधने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहेत, अशी माहिती भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव प्रा. उमेश कदम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. कदम म्हणाले, ‘‘शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराज सेंटर ऑफ स्टडीज फॉर मराठा हिस्ट्री व भारतीय इतिहास संशोधन परिषद यांच्यात येत्या काही दिवसांत सामंजस्य करार केला जाणार आहे. त्याची प्राथमिक बैठक विद्यापीठ प्रशासनासमवेत झाली. मराठी व मोडी लिपीतील प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन काळातील साधने राष्ट्रीय पातळीवर डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहेत. करारांतर्गत सेमिनार, प्रोजेक्ट, ऑनलाईन चर्चा घेण्याविषयी बैठकीत झाली. विद्यापीठ प्रशासन कराराबाबत सकारात्मक आहे.’’
ते म्हणाले, ‘‘प्रत्येक राज्यात अपरिचित शूरवीरांचा इतिहास दडला आहे. त्याच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. तसेच त्या इतिहासाची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. इतिहासातील त्रुटींचे निराकरण करण्याचाही आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून, अमराठी भाषिकांपर्यंत मराठ्यांचा इतिहास पोचवला जाणार आहे. एनसीईआरटी व सीबीएसई अभ्यासक्रमांत मराठ्यांचा जाज्वल्यपूर्ण इतिहास समाविष्ट असावा, याकरिता आमची समिती निरीक्षण करत असते.’’
पत्रकार परिषदेस इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. अवनिश पाटील उपस्थित होते.


शब्दकोशाची तयारी
मराठा इतिहासासंदर्भात छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्रातर्फे शब्दकोश तयार केला जात आहे. तो ऑनलाईन आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेंटरमध्ये २ लाख ९६ हजार मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रा. डॉ. अवनिश पाटील यांनी दिली.

इतिहासाची मांडणी आवश्‍यक
छत्रपती शाहू महाराज सेंटर ऑफ स्टडीज फॉर मराठा हिस्ट्रीने स्पेशल प्रोजेक्ट घेऊन काम करावे. फ्रेंच, पोर्तुगीज भाषेतील कागदपत्रे पडताळण्यासाठी भाषांचे वर्ग येथे सुरू व्हावेत. अस्खलित साधनांचा विचार करता परदेशी व देशी साधनांत घटनांच्या प्रस्तुतीकरणातून अनर्थ घडू नये, याची खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी विशिष्ट मेथडॉलॉजीतून इतिहासाची मांडणी आवश्यक असल्याचे प्रा. कदम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10394 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..