रडायचं नाही....लढायचं....! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रडायचं नाही....लढायचं....!
रडायचं नाही....लढायचं....!

रडायचं नाही....लढायचं....!

sakal_logo
By

रडायचं नाही....लढायचं....!

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : दिव्यांग असूनही त्याची चिंता नाही. प्रतिकूल परिस्थितीशी झगडणं हाच त्यांचा दिनक्रम. चेहऱ्यावर आनंदाच्या छटा आणि आयुष्यात सक्षमपणे जगण्याची त्यांची लढाई वेगळीच. ''रडायचं नाही लढायचं,'' हाच संदेश देत जगणारी ही माणसं. त्यांचं जगणं एखाद्याला प्रेरणा देणारं तसेच नवी उमेद देणारं. त्यांच्या आयुष्याची ही कहाणी...

पोलिओ असूनही
टेलरिंगचा व्यवसाय
‘‘नऊ महिन्यांचा होतो, त्यावेळी उजव्या पायाला पोलिओ झाला. आई आक्काताई व वडील श्रीपती पाटील यांना तो धक्का होता. दोघेही शेतीत राबणारे. मी जसा मोठा होऊ लागलो तशी त्यांनी मला ऊर्मी दिली. तुला काय झालेलं न्हाई, असे म्हणत त्यांनी माझ्या शिक्षणात कसूर केली नाही. मी जुनी एसएससीपर्यंत शिकलो आणि १९७२ ला टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. तो वयाच्या ६९ व्या वर्षीही सुरू आहे,’’ कसबा बावड्यातील चौगले गल्लीमधील आनंदा पाटील सांगत होते. एसएससीनंतर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. ताराबाई रोडवरील टेलरिंगचा डिप्लोमा केला. पुढे बावड्यात टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. मुलगा सागर दहावी, तर विवेक बारावीपर्यंत शिकला. दोघेही खासगी रुग्णालयात काम करतात. श्री. पाटील यांनी व्यवसायाची घडी बसवून जीवन समृद्ध कसे जगावे, याचे उदाहरण घालून दिले आहे.


‘उस्मान’ची धडपड
अन् व्यवसायात चलती
उस्मान रफिक नदाफ बावड्यातल्या पिंजार गल्लीतला रहिवासी. त्याची उंची तीन फूट. हातात ताकदही थोडी कमी. भाई माधवराव बागल प्रशालेत त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. वडील रफिक पेंटर तर आई खेळण्यांची विक्री व्यवसायातली. दहावीनंतर उस्मानने थेट छोट्या व्यवसायात प्रवेश केला. मोबाईलचा हट्ट धरण्यापेक्षा व्यवसायातून आई-वडिलांना आर्थिक आधार देण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला. भाजीपाला, पापड व लोणचे ते गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्याची विक्री तो करतो. व्यवसायात लाजायचं नाही, हे त्याचे सूत्र प्रभावी ठरले आहे. उंची कमी असल्याने तो कधी कोणाकडून सहानुभूतीची अपेक्षा करत नाही.


एक्स रे टेक्निशियन
युवराज चव्हाण...
‘‘ये गिड्ड्या, ये छोट्या,’’ हे शब्द उंची लहान असल्याने युवराज विलास चव्हाण यांच्या कानावर पडायचे. त्याची पर्वा मात्र त्यांनी केली नाही. वडील साखर कारखान्यात नोकरीला होते. त्यांनी बलभीम विद्यालयात त्यांचे नाव दाखल केले. सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर छत्रपती राजाराम हायस्कूलमधून ते दहावीपर्यंत शिकले. खासगी रुग्णालयात एक्स रे टेक्निशियन म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. आठ वर्षे ते हे काम करतात. सध्या अजिंक्यतारा कॉलनीत भाडेतत्त्वावर राहतात. प्रत्येक संकटाला सामोरे गेलो तरच आयुष्य जगण्यात आनंद आहे, असे ते सांगायला विसरत नाहीत. कोणी चेष्टा अथवा टिंगल करण्याचा प्रयत्न केला तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि काम करत राहा, असेच ते सांगतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10409 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..