पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

52481

पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ फुलली
झेंडू, मोगऱ्याची वेणी, कमळ फुलांना मागणी वाढली
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. २५ : नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठेत हाऊसफुल्ल गर्दी आहे. फुलांची बाजारपेठ गर्दीने न्हाऊन निघाली आहे. देवीच्या पूजेला लागणाऱ्या झेंडू, मोगऱ्याची वेणी, कमळ आदी फुलांना मागणी वाढली आहे. कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, जोतिबा रोड, फूल बाजार आदी ठिकाणी फुलांसह फुले आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीला उधाण आले. झेंडूच्या फुलापासून, नारळ, उदबत्ती, कापूर, नाडापुडी, पत्रावळी, मातीचे मडके, खाऊच्या पानांना मोठी मागणी आहे. अंबाबाई मंदिरासह नवदुर्गा मंदिराच्या आवारात पूजा साहित्य विक्रीची दुकाने उभारली आहेत.
घरोघरी देवघरात घटांची प्रतिष्ठापना केली जाते. खास नवरात्रोत्सवानिमित्त पत्रावळी, नाडापुडी, उदबत्तीचे झाड याला मोठी मागणी आहे. पाच ते दहा रुपयाला नाडापुडीची विक्री केली जात आहे. नाडापुडीमध्ये उदबत्ती, लाल पिवळ्या धागांनी बांधून हळदी-कुंकवाच्या पुड्या मिळतात. लाल-पिवळा धागा हा समई अथवा दिव्यांना बांधला जातो.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्यानंतर घरोघरी घटाला रोज झेंडूंच्या फुलांची माळ बांधली जाते. सध्या ४० ते ६० रुपये प्रतिकिलो झेंडू फुलांची विक्री सुरू आहे. अंबाबाई मंदिर, भवानी मंडपातील तुळजा भवानी मंदिरासह शहरातील नवदुर्गा मंदिराबाहेर पूजा साहित्य विक्रीत मोठी उलाढाल होत आहे. नवरात्रात देवीची ओटी भरली जाते. ओटीची किंमत ४० रुपयांपासून २०० रुपये आहे. साडीच्या दर्जा व किमतीवरून ओटीचा कमी जास्त दर ठरत असतो.
------
नवदुर्गा मंदिराबाहेर स्टॉल
नवरात्रोत्सवात तेल घालण्यासाठी येणारे भाविक उदबत्ती, कापूर खरेदी करत असल्याने मंदिरांबाहेर पूजेचे स्टॉल लागले आहेत. तेलापासून ते उदबत्तीपर्यंतचे सर्व पूजेचे साहित्य या स्टॉल वर विक्रेत्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्यासोबत नवरात्रीत नारळ न फोडता अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे बाजारात नारळालाही मागणी वाढल्याचे चित्र होते.