पालकांचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांचे निवेदन
पालकांचे निवेदन

पालकांचे निवेदन

sakal_logo
By

जरग विद्यामंदिरच्या पालकांचा
गुरुवारपासून बेमुदत बहिष्कार
शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांची बदली रोखण्याची मागणी
कोल्हापूर, ता. १ : ‘शिष्यवृत्तीचा जरगनगर पॅटर्न’ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या महापालिकेच्या ‘लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग’ विद्यामंदिरावर बेमुदत बहिष्कार टाकून सहा ऑक्टोबरला धरणे आंदोलन करण्याचा इशारा पाचवीच्या विद्यार्थ्याच्या पालकांनी आज दिला. शिष्यवृत्ती वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची ऑगस्टमध्ये बदली केल्याच्या निषेधार्थ पालकांनी हा इशारा दिला आहे. बदली झालेल्या शिक्षकांना किमान सहा महिने शाळेवर कायम ठेवा, अशी पालकांची मागणी आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीस दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या शहरातील अनेक शाळा बंद पडल्या असून, बहुतांश शाळांची परिस्थिती बिकट आहे. कित्येक शाळांचा पट १०० हून कमी आहे. या स्थितीत शहरातल्या मोजक्याच म्हणजे सहा ते सात शाळा खूप चांगल्या प्रकारे सुरू आहेत. त्यात जरग विद्यामंदिर टॉप आहे. ‘शिष्यवृत्ती पॅटर्न’मुळे विद्यार्थ्यांचा ओढा येथे जास्त आहे. यंदा ऑगस्‍टमध्ये महापालिकेने केलेल्या बदल्यांमुळे शाळेतील शिष्यवृत्तीच्या वर्गातल्या दोन शिक्षिकेंची बदली करण्यात आली. यामुळे पालकांना धक्काच बसला. शिष्यवृत्ती पॅटर्ननुसार अभ्यासक्रम ७० टक्के शिकवून झाला असताना या बदल्या करण्यात आल्या. मे- जूनमध्ये बदल्या होतात. पण, यंदा मात्र ऑगस्टला बदल्या झाल्याने शिष्यवृत्ती वर्गाचे नियोजन विस्कळीत झाले.
किमान सहा महिने शिक्षिकेंना शाळेत कामगिरीवर ठेवा, अशी मागणी केली. ती मान्य करून तसे आदेशही काढण्यात आले. त्यानंतर काही शिक्षक संघटनांनी महापालिकेसमोर निदर्शन केल्यानंतर या आदेशाला स्थगिती देण्यात आली. यामुळे पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिष्टमंडळात बाळासाहेब काळे, महेश आरभावे, उद‌यसिंग निकम, दत्तात्रय आडसुळे, पी. ए. पाटील यांचा समावेश होता.