रावत व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावत व्याख्यान
रावत व्याख्यान

रावत व्याख्यान

sakal_logo
By

54336
उद्योजक, व्यापारी धनवान, शेतकरी कंगाल
भूपेंद्रसिंग रावत : देशात सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे संपविण्याचे काम


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे संपविण्याचे काम सुरू असून, देश षड्‌यंत्रात फसत आहे. केवळ संविधानच नव्हे, तर महिला, जवान व देशाची सीमाही धोक्यात आहे. उद्योजक, व्यापारी धनवान होत असताना शेतकरी मात्र कंगाल होत असल्याचे दिसत आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील नेते भूपेंद्रसिंग रावत यांनी आज येथे केले. अन्यायग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी विचार मंच, मावळा कोल्हापूर व शिवराज्य मंच कागलतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान झाले. या वेळी ‘टू मच डेमोक्रॉसी’ विषयावरील माहितीपट दाखविला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये व्याख्यान झाले.
श्री. रावत म्हणाले, ‘‘देशाच्या हिताचे कायदे करण्याचे काम संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार करत होते. या कायद्यांची अंमलबजावणी होण्यापूर्वी मोदी सरकार सत्तेवर आले. ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी हिताच्या निर्णयांची अंमलबजावणीची ग्वाही दिली होती. तत्पूर्वीच, त्यांचा अपघाती मृत्यू झाला. भूमीहिनांचे भविष्य निश्‍चित करण्याबाबत भाजपच्या स्टार प्रचारक सुषमा स्वराज्य यांची भेट घेतली होती. जमिनीच्या वाढणाऱ्या किंमतीत शेतकऱ्यांच्या हिश्‍श्‍याची मागणी आम्ही केली होती. शेतकऱ्यांचे विकासातील योगदान समजून घेण्याबाबत त्यांना सांगितले होते. व्यापारी व उद्योजक धनवान होत असून, शेतकरी कसा दारिद्र्याच्या खाईत लोटत आहे, याचे स्पष्टीकरण केले होते.’
या वेळी भारती पोवार, ॲड. गुलाबराव घोरपडे, उमेश पोवार, इंद्रजित घाटगे, विक्रम भोसले, सचिन घोरपडे, चंद्रकांत यादव उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.
---------------
चौकट
दिल्ली आंदोलनात
कोल्हापूरचे मिठारी सहभागी
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात कोल्हापुरातील अभिषेक मिठारी दहा दिवस सहभागी झाले होते. त्यांच्यासह ‘टू मच डेमोक्रॉसी’ माहितीपटाचे दिग्दर्शक वरुण सुखराज, प्रसाद झावरे, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते संदीप गिड्डे-पाटील यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा देऊन सत्कार झाला.