फुटबॉल संघाचे ''वीस'' लाखांचे बजेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल संघाचे ''वीस'' लाखांचे बजेट
फुटबॉल संघाचे ''वीस'' लाखांचे बजेट

फुटबॉल संघाचे ''वीस'' लाखांचे बजेट

sakal_logo
By

फुटबॉल संघाचे वाढले बजेट
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू खेळणार; ६ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू

सुयोग घाटगे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : यंदाचा फुटबॉल हंगाम खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज असणार आहे. मैदानावर टक्कर होण्यापूर्वीच संघ बांधणीसाठी शहरातील संघांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.  कोरोनानंतर मोकळेपणाने पहिल्यांदाच हा हंगाम होत आहे, तर आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी फुटबॉल संघ जवळ केले आहेत.   
यंदाच्या वर्षी जिल्हा बाहेरील तीन खेळाडूंना खेळण्याची मुभा मिळाल्यामुळे प्रत्येक संघाने परदेशातील दोन तर राष्ट्रीय एक अशा खेळाडूंचा समावेश स्वतःच्या संघामध्ये केला आहे. यासाठी संघानी मानधनासाठी व हंगामासाठी येणाऱ्या खर्चासाठी म्हणून पंधरा ते वीस लाख रुपयांचे बजेट ठेवले आहे. यातच इच्छुक फायनान्सर काही संघाच्या पाठीशी उभारल्यामुळे फुटबॉलच्या मैदानावरही इच्छुकांचा सामना रांगणार आहे. 
 कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. केएसएकडून हंगामाची घोषणा होऊन सहा नोव्हेंबरपासून संघ नोंदणीला सुरुवात होत आहे.  यामुळे प्रत्येक संघाने आता कंबर कसली आहे. यंदाच्या वर्षी जेतेपद मिळवायचे या हेतूने संघ बांधणीत कोणतीही कसर राहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक संघात दोन परदेशी तर एक राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू सामील केला जात आहे. तसेच मागील काही हंगामामध्ये चमकदार कामगिरी करून आपल्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले स्थानिक खेळाडूही मागे नाहीत. यामुळे संघांनीहा आर्थिक दृष्ट्या आपले हात आणखीन सैल केले आहेत. याचाच परिणाम यावर्षी संघांचे बजेट हे दहा लाखावरून दुप्पट होऊन वीस लाखांच्या घरात गेले आहे. या बजेट वाढीमागे येत्या कालावधीमध्ये होणाऱ्या निवडणुकांची झालर आहे. अनेकजण खेळ व खेळाडूंचे पाठीमागे आर्थिक दृष्ट्या उभे राहून आपली वोटबँक वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. याचा फायदा संघांना परिणामी खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या होत आहे.


कोट 
यंदाचा हंगाम चांगला होण्यासाठी सरावाला सुरुवात झाली आहे. असे असले तरीही संघामध्ये अनेक बदल होत असून, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्थानिकसह परदेशी खेळाडूंचे भाव वधारले असून, बजेटमध्ये वाढ झाली आहे. 
-शरद माळी, अध्यक्ष, पीटीएम फुटबॉल संघ 

कोट 
संघ अधिक मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले जात असून, यामुळे आर्थिक भारही वाढला आहे. स्थानिक खेळाडू, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू अनेक संघांमध्ये दिसतील. यामुळे मैदानावर बहारदार खेळ बघायला मिळेल. 
-रमेश मोरे, व्यवस्थापक, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब