दौलत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौलत बैठक
दौलत बैठक

दौलत बैठक

sakal_logo
By

फोटो - KOP22L60943,
KOP22L60944

‘दौलत’ची चर्चा फिस्कटली

तणावपूर्ण तीन तास बैठक, कारवाईबाबत कारखाना प्रशासन ठाम, कामगारांचा आज प्रवेशद्वारासमोर मेळावा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ७ : हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड कंपनी संचलित दौलत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व कामगार, शेतकरी, सर्वपक्षीय नेते यांच्यातील तीन तास चाललेली बैठक तणावपूर्ण चर्चेनंतर आज फिस्कटली. कारखान्यातील दगडफेक प्रकारातील ५९ पैकी १७ कामगारांना कारखान्याच्या आवारात कामावर घेण्यास अध्यक्षांनी नकारघंटा वाजवली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. कामगारांना बोनस द्यावा, ५९ कामगारांवरील निलंबन मागे घ्यावे, कारखाना सुरू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, चर्चा फिस्कटल्यानंतर कामगार नेते प्रा. सुभाष जाधव यांनी कामगारांचा उद्या (ता. ८) दुपारी दोन वाजता कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर मेळावा घेण्याची घोषणा केली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुरुवातीलाच कारखान्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांना सांगितले. त्यावर खोराटे म्हणाले, ‘कारखाना आजही सुरू आहे. बोनसबाबत चर्चेसाठी कोणीही आले नाही. कारखान्याच्या गेटवर झालेल्या दगडफेकीतील ५९ कामगारांना निलंबनाची नोटीस दिली आहे. कामगारांना त्यांना वगळून कारखाना सुरू करायचा आहे.’
सिटूचे अध्यक्ष प्रा. सुभाष जाधव म्हणाले, ‘कामगारांच्या महागाई भत्त्यात २३५० रुपयांची कपात केली आहे. तीन वर्षांत इन्क्रीमेंटचा शब्द पाळला गेलेला नाही. कामगारांची प्रॉव्हिडंट फंडाची नवी खाती कशासाठी काढली? कामगारांत फूट पाडली. कलेक्टर, आमदार खिशात आहेत, ही व्यवस्थापनाची भाषा आहे. ५९ कामगारांचे निलंबन मागे घेऊन कारखाना सुरू करूया.’
खोराटे यांनी आमदार, जिल्हाधिकाऱ्यांबाबत वक्तव्य केले नसल्याचा खुलासा केला. त्यावर संतप्त कामगारांनी त्याबाबतचा व्हिडीओ दाखविण्याची मागणी केली. जाधव यांनी लेखी करार करण्याची मागणी केली. माजी आमदार भरमू पाटील म्हणाले, ‘कारखाना चालविण्याचा ३९ वर्षांचा करार आहे. व्यवस्थापनाला १६५ कोटी कर्ज फेडायचे आहे. कारखाना गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उत्तम चालेल.’
आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘तालुक्यातील राजकीय पुढारी कारखाना बंद पाडण्यात पुढे असल्याचे आरोप होत आहेत; असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा नावे घेऊन बोलावे.’
शिवानंद हुंबरवाडी म्हणाले, ‘५९ कामगारांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय घ्यावा.’
माजी आमदार गोपाळ पाटील म्हणाले, ‘कामगार व कार्यकर्त्यांत भांडण लावू नका.’ संग्राम कुपेकर बाजू मांडताना त्यांना कामगारांनी रोखले.
प्रदीप पवार यांनी दगडफेकीच्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. तरीही पिस्तुलीची भाषा ऐकवली जात असल्याचा आरोप केला. ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई यांनी व्यवस्थापनाला जिल्हाधिकाऱ्यांचा मान पाळता येत नसेल तर कारखाना सोडून द्यावा, असे सांगितले. अखेर न्यायालयातील दावे व कामगारांच्या बदल्या मागे घ्याव्यात. त्रिपक्षीय लेखी करार करावा आदी मागण्या केल्या. रेखावार यांनी दोन्ही बाजूंकडून बेकायदेशीर काही करार नाही, असे लिहून देऊन कारखाना सुरू करण्याचा सल्ला दिला; पण कामगारांना कामावर न घेण्याबाबत अध्यक्ष ठाम राहिले. यावेळी तानाजी गडकरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, इंटकचे प्रा. आबासाहेब चौगुले, दौलत सहकारी साखर कारखाना चेअरमन अशोक जाधव, व्हाईस चेअरमन संजय पाटील, भिकू गावडे, पांडुरंग बेणके, राम पाटील, विष्णू गावडे उपस्थित होते.
-----------
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचा शब्द खोराटे पाळत नाहीत. हा जिल्ह्याचा अपमान आहे, या शब्दांत कामगारांनी संताप व्यक्त केला. तसेच अथर्वच्या अधिकाऱ्यांकडूनही चुका झाल्या. मग त्यांना कोणत्या शिक्षा दिल्या, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांकडून जिजिया कर आकारत असल्याचा आरोप केला.
-----------
संदीप.