‘मेन राजाराम’चा निर्णय रद्द करा; आमदार विनय कोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मेन राजाराम’चा निर्णय रद्द करा; आमदार विनय कोरे
‘मेन राजाराम’चा निर्णय रद्द करा; आमदार विनय कोरे

‘मेन राजाराम’चा निर्णय रद्द करा; आमदार विनय कोरे

sakal_logo
By

‘मेन राजाराम’चा निर्णय रद्द करा
आमदार विनय कोरे; मुख्यमंत्र्यांना निवेदन, खास बाब म्हणून निधीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : कोल्हापूरचा अभिमान व अस्मिता असणाऱ्या ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलचे संभाव्य नियोजित स्थलांतर कामस्वरूपी रद्द करावे. तसेच, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांची साक्ष असणारे हे वारसा स्थळ जतन करावे, अशी मागणी आमदार विनय कोरे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर मेन राजाराम हायस्कूलला ऊर्जितावस्था आणण्यासाठी, दुरुस्तीसाठी, भौतिक सुविधेसाठी खास बाब म्हणून निधी द्यावा, अशी विनंती केली आहे.
छत्रपती राजाराम महाराज यांनी तत्कालीन करवीर संस्थानातील मुलांच्या शिक्षणासाठी १८७१ मध्ये ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूलची स्थापना केली. या हायस्कूलमध्ये गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, अनेक मंत्री, खासदार, आमदार व ख्यातनाम साहित्यिकांनी शिक्षण घेतले आहे. या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिलेले आहे.
सध्या या विद्यालयात ७५० पेक्षा अधिक पट संख्या असून शहरातील एक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण केंद्र म्हणून हे सरकारी विद्यालय आहे. आपल्या मंत्रिमंडळातील शालेय शिक्षणमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार या ऐतिहासिक हायस्कूलचे अन्यत्र स्थलांतर करून येथे पर्यटन केंद्र, यात्री निवास, हॉटेल अशा स्वरूपाचे व्यावसायिक केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. यामुळे कोल्हापूरमधील नागरिक, विविध संघटना, राजकीय पक्षांनी या गोष्टीला कडाडून विरोध केलेला आहे. याबाबत जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सर्व प्रकारची गंभीर दखल घेऊन तत्काळ या स्थलांतराचा विषय बंद करावा. तसेच, या शाळेला शिक्षक, निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी डॉ. कोरे यांनी केली आहे.
-----
चौकट
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका
मेन राजाराम हायस्कूलचे संभाव्य स्थलांतरास प्रतिबंध करण्यासाठी कोल्हापूरची जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. तसेच, या शाळेचे स्थलांतर झाल्यास शहर व परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होणार आहे, असेही आमदार कोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.